प्रवाशाला मुदत संपलेला मिल्कशेक! स्पाईटजेटला ६० हजारांचा दंड

बंगळुरू- दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानात स्पाईटजेट कंपनीने त्यांच्या एका प्रवाशाला मुदत संपलेला मिल्कशेक दिला. त्यामुळे तो प्रवासी आजारी पडला. एन श्रीनिवासमूर्ती असे प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी न्यायालयाने स्पाईटजेटला ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण २० जून रोजीचे आहे. याप्रकरणी बंगळुरुमधील न्यायालयाने आता निकाल दिला असून स्पाईटजेटला लवकरात लवकर दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
श्रीनिवासमूर्ती हे बंगळुरुमधील रहिवासी आहेत. ते २० जून रोजी स्पाइसजेटच्या विमानाने दुबईतून मुंबईत येत होते. या प्रवासादरम्यान त्यांनी मिल्क शेक ऑर्डर केला. विमानातील कर्मचाऱ्याने त्यांना मिल्कशेकचे ८० मिलीचे एक पाकीट दिले. त्यांनी मिल्कशेक पिल्यानंतर त्या पाकीटाची अंतिम तारीख तपासली. तेव्हा १८ जून ही मिल्कशेकची अंतिम तारीख असल्याचे त्यांना आढळले. मिल्कशेक प्यायल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नंतर ते आजारी पडले. या आजारपणामुळे आपले व्यावसायिक नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी स्पाईटजेटविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. श्रीनिवासमूर्ती यांनी सांगितले की, तब्येत बिघडल्यामुळे आठवडाभर ते कुठेही बाहेर जाऊ शकले नाहीत. त्यांचे २२ लाख रुपयांचे नुकसान झाले.
श्रीनिवासमूर्ती यांनी व्यावसायिक नुकसानापोटी २२ लाख रुपये, वैद्यकीय खर्चापोटी ९ लाख रुपये, यामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे एक लाख रुपये व प्रवास खर्चाचे ५० हजार रुपये अशी एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांच्या लाख रुपच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. मात्र, श्रीनिवासमूर्ती त्यांच्या वैद्यकीय स्थितीबाबत कोणताही ठोस पुरावा सादर करू शकले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाने निर्णय देत कंपनीला ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला. बंगळुरु न्यायालयाने स्पाईटजेटला त्यांच्या निष्काळजीपणासाठी २५ हजार रुपये, प्रवाशाला मानसिक त्रास झाल्याप्रकरणी २५ हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चासाठी १० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top