मुंबई हादरली! विनोद घोसाळकरांच्या पुत्राचा परिचिताने केलेल्या गोळीबारात धक्कादायक मृत्यू

मुंबई- उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात सत्तारूढ पक्षाच्या आमदारानेच गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच, आज दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर मोरीशभाई नोरोवा नावाच्या परिचिताने गोळीबार केला. या गोळीबारात घोसाळकर यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्यावर गोळीबार करणारा मोरीशभाई यानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरून गेली आहे. विशेष म्हणजे मोरीश व अभिषेक यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. त्यानंतर काही मिनिटांतच ही घटना घडली. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शिवसेनेतील फुटीनंतर माजी आमदार विनोद घोसाळकर व त्यांचे कुटुंबीय उद्धव ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच या भागातही ठाकरे आणि शिंदे गटात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. आज या भागात उद्धव ठाकरे यांचा दौरा होता, पण तो काही कारणास्तव रद्द झाला. दरम्यान, आज अभिषेक घोसाळकर यांना मोरीश नोरोवा नावाच्या परिचिताने एका कार्यक्रमासाठी आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. भेटीनंतर दोघांनी एकत्र बसून फेसबुक लाईव्ह केले. यावेळी अभिषेक म्हणाला, आम्हाला एकत्र पाहून अनेकांना आश्‍चर्य वाटले असेल, पण एक चांगला व्हिजन घेऊन आमचा लोकांसाठी काम करण्याचा विचार आहे. पूर्वी आमच्यात जे गैरसमज होते ते दूर झाले, असे दोघांनीही सांगितले. त्यानंतर काही सेकंदातच मोरीशभाई उठला व त्याने अभिषेकवर 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:वरही 4 गोळ्या झाडून आत्महत्या केली. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला करुणा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण तिथे अभिषेकचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दहिसरमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेचे वृत्त वार्‍यासारखे मुंबईत पसरताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दहिसरकडे धाव घेतली. तसेच या घटनेबद्दल सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार असलेले विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर हे दोन वेळा नगरसेवक होते. तर त्यांची पत्नीही नगरसेविका होती. दहिसर परिसरात घोसाळकर कुटुंबाचे मोठे वर्चस्व आहे. तसेच कामही आहे. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळे परिसरात प्रचंड तणाव आहे. अभिषेकच्या हत्येनंतर मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक व मोरीशभाई यांचे पूर्वी चांगले संबंध होते. मात्र मोरीशभाई याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात अभिषेकनेच आपल्याला फसवले असा त्याचा समज होता. त्यामुळे बदला घेण्याच्या हेतूनेच त्याने काही दिवसांपासून अभिषेक बरोबर जुळवून घेतले आणि आज त्याला आपल्या कार्यालयात बोलावून घेऊन त्याची हत्या केली व स्वत:वरही गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. मात्र लागोपाठच्या या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. कारण एकाच आठवड्यात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहेत. जळगावच्या घटनेत नगरसेवक जखमी झाला. कल्याणच्या घटनेत शिंदे गटाचे 2 पदाधिकारी जखमी झाले तर आज एका माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top