रास्ता रोको बंद! आज जरांगे पोलखोल करणार! मराठ्यांच्या विरोधात षड्‌‍यंत्र करणाऱ्यांची नावे सांगणार

जालना- मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी उद्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची निर्णायक बैठक आयोजित केली आहे. उद्याची बैठक ही शेवटची निर्णायक बैठक असेल, सरकारच्या जवळची माणसे मराठ्यांविरोधात काय काय षड्‌‍यंत्र रचत आहेत आणि याबाबत मी सगळ्यांना सांगणार आहे, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले. सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने केलेल्या विलंबामुळे जरांगे आणि मराठा समाज सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. जरांगेंच्या आवाहनानंतर आज राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दुपारी या रास्तारोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात आले.
जरांगेंनी आज सकाळी पत्रकार परिषदेत सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गोरगरिब मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. मी सलाईनवर जगत आहे, पण सरकारचे याकडे लक्ष नाही. काही मंत्र्यांच्या विरोधामुळे तुम्ही कायद्याची अंमलबजावणी थांबवत आहात. पूर्वी राजेशाहीत आंदोलन केली की राजाला दया यायची. पण आताच्या राजाला दया-माया काहीच नाही. पूर्वीच्या काळात एकच राजा होता, त्यामुळे जनतेला लगेच न्याय मिळायचा. पण आता 3 राजे आहेत. त्यामुळे जनतेला न्याय मिळणे जरा अवघड आहे. आंदोलन करून न्याय मिळविण्याशिवाय जनतेकडे आता दुसरा पर्याय नाही. 3 राजे एकत्र आहेत. त्यामुळे लवकर निर्णय घ्या. मराठ्यांना वेठीस धरू नका. अधिसूचना तुम्ही काढली. अधिसूचना काढून किती दिवस झाले? इतक्या दिवसात तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही का? एक राजा निर्णय घेत असेल तर इतर दोन राजांनी त्याला साथ द्यावी.
रास्ता रोकोबाबत जरांगेंनी सांगितले की, आज गावागावांत रास्ता रोको करण्यात आला. पण उद्यापासून रास्ता रोको केला जाणार नाही. उद्या दुपारी 12 वाजता आपली बैठक होणार आहे. उद्या मराठा बांधवांनी अंतरवालीत यायचे आहे. मला माझ्या समाजासोबत काही महत्त्वाचे बोलायचे आहे. उद्याची बैठक ही शेवटची निर्णायक बैठक असेल. मराठा बांधवांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे. या बैठकीत आपल्या विरोधात काय काय षड्‌‍यंत्र सुरु आहेत, 13 मार्चची तारीख अचानक का घेण्यात आली, याबद्दल मला सविस्तर आपल्या समाजासोबत बोलायचे आहे. कालच्या दिवसांत आणि परवाच्या रात्री खूप काही घडले आहे ते मला मराठा समाजाला सांगायचे आहे. आज 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर रास्ता रोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात केले. आंदोलनात फक्त एकच बदल करण्यात आला आहे. रास्ता रोकोचे रुपांतर धरणे आंदोलनात करण्यात आले. यामागे अनेक कारणे आहेत. काल बंजारा बांधव आले होते. त्यांनी आम्हाला आतापर्यंत खूप साथ दिली आहे. बंजारा समाजाची नाशिकमध्ये मोठी यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण देशातून त्यांचा समाज दाखल होणार आहे. 24 ते 27 त्यांची यात्रा आहे. चर्मकार बांधवदेखील काल आले होते. चर्मकार समाजाच्या संत रोहिदास यांची जयंती आहे. त्यासाठीदेखील अनेक बांधव येणार आहेत. त्यामुळे आम्ही हा आंदोलनात बदल निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व समाजाला मानणारे आहोत. आम्ही भावनाशून्य नाही आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे आता आम्हीदेखील बंजारा आणि चर्मकार समाजाच्या बांधवांना सहकार्य करणार आहोत. मी हरणारा माणूस नाही. आंदोलनात बदल करणे म्हणजे माघार नाही. मराठा समाजाला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
सरकारवर टीका करत जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्याच्या जवळचा व्यक्ती षड्‌‍यंत्र रचत आहे. वेळ आली की सगळ्यांचीच नावे घेईन. उद्याच्या बैठकीत अनेक गोष्टी महाराष्ट्रासमोर येणार आहेत. नवे डाव आखण्यासाठी बरेच लोक कामाला लागले आहेत. डाव आखणाऱ्यांमुळे अनेक मंत्री अडचणीत येतील. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या लोकांना थांबवावे. तुम्ही असे वागलात तर तुमचीच बदनामी होणार आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना माहीत आहे की, मी कोणाबद्दल बोलत आहे. त्या माणसाने स्वत: सांगितले की, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्याच्या सोबत आहेत. हे सगळे थांबवले नाही तर सरकारच हे सगळे करत असल्याचे आम्ही आमच्या समाजाला सांगू. यामध्ये प्रत्येकाचे नाव सांगितले जाईल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीसांची काळजी करु नका, आंदोलन शांततेत करा. प्रत्येक तालुक्यात नोटीस दिल्या आहेत, त्या स्वीकारल्या तरी काही हरकत नाही. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर इकडे माझ्याकडे या. काही पोलीस शांततेत आंदोलन करून देखील गुन्हे दाखल करत आहेत. गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे सगळे सुरु आहे. तुम्ही मला कैद किंवा अटक करणार आहात का? मी तुमचा डाव साधू देणार नाही.
मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यात आज ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला. सोलापूर, नांदेड, वैजापूर-कन्नड मार्ग, वडनेर-पाथर्डी मार्ग, सोलापूर-धुळे महामार्ग, अहमदनगरमधील एमआयडीसी चौक, लोणावळ्यातील जुना मुंबई महामार्ग, पैठण, कल्याण, ठाणे यासंह राज्यभरात रास्तारोको करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी सहभाग घेतला होता. छत्रपती संभाजीनगरात समृध्दी महामार्गावर मराठा बांधवांनी रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ठाण्यात कॅडबरी चौकात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top