वायकर भ्रष्ट! सोमय्या बेंबीच्या देठापासून ओरडले! पण कमळाशी मैत्री होताच वॉशिंग मशीन सज्ज झाले

मुंबई- भाजपाचे वॉशिंग मशीन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. शिवसेना उबाठा गटातील नेते आमदार रवींद्र वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधताना 500 कोटींचा घोटाळा केला असा आरोप किरीट सोमय्यांनी करताच पालिकेनेही त्यांना नोटीस बजावली होती. पण वायकरांनी भाजपाशी मैत्री असलेल्या शिंदे गटात जाण्याचे मान्य करताच वायकरांच्या निवेदनावर आम्ही विचार करू, असे निवेदन आज पालिकेने न्यायालयात दिले आणि वायकरांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून बेदाग करण्याची प्रक्रिया सुरू केली.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड लगतच्या वेरावली गावात खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेला भूखंड पालिकेची दिशाभूल करून वायकर यांनी स्वतःच्या ताब्यात घेतला. या भूखंडावर 500 कोटी रुपये खर्च करून पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे, असा आरोप करीत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून प्रथम मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढे हे प्रकरण अंमलबजावणी संचलनालयाकडे (ईडी) वर्ग करण्यात आले. ईडीने वायकर यांच्या विरोधात मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तेव्हापासून वायकर हे ईडीच्या रडारवर आले आहेत.
या प्रकरणीच्या तपासादरम्यान 11 जानेवारी 2024 रोजी ईडीने वायकर यांचे निवासस्थान आणि त्यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी एकाच वेळी छापे घातले होते. त्या छाप्यांमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी करून ईडीने त्यांना 29 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते.त्यावेळी वायकर चौकशीला हजर राहिले. ईडीच्या कार्यालयात त्यांची सलग नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स पाठविले. मात्र ईडीच्या दुसऱ्या समन्सला ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे वायकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार राहिली. अखेर वायकरांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय त्यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसमोर बोलून दाखविला आहे. ईडीची चौकशी टाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अमित शहा यांना फोन करण्याची विनंती आपण उद्धव ठाकरे यांना केली, पण आपण असे काही करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे आता शिंदे गटात जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. अटक करून तुरुंगात डांबले तर आपण एक दिवसही जिवंत राहू शकत नाही. कारण आपल्या हृदयात पाच-पाच स्टेंट टाकलेले आहेत, असे वायकर कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले होते. वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार अशी चर्चा जोगेश्वरीमध्ये तेव्हापासूनच सुरू झाली आहे.आज अचानक मुंबई महानगर पालिकेने कोलांटउडी मारत वायकर यांच्या प्रस्तावावर पुन्हा विचार करू असे निवेदन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिल्याने भाजपाच्या वॉशिंग मशीनच्या दिशेने वायकर यांचा प्रवास सुरू झाला आहे हेच स्पष्ट झाले.
वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश जानेवारी महिन्यातच होणार होता. मात्र काही कारणांमुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबला आहे. परंतु त्यांना शिंदे गटात घेतले जाईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच वायकर गेल्या काही दिवसांपासून तयारीला लागले आहेत. आपल्या मतदार संघातील शिवसेनेच्या सर्व शाखांना एक एक करून वायकर भेट देत आहेत. आपण शिवसेना उबाठा गट सोडण्याचा निर्णय का घेत आहोत हे शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ते पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जोगेश्वरीतील बहुतांश शिवसैनिक हे ठाकरे घराण्याशी निष्ठा राखून आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वायकर यांना फारसा प्रतिसाद लाभत नाही. नुकतीच वायकरांनी प्रभाग क्रमांक 73 मधील शिवसेना शाखेला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र तिथेही त्यांना अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही, असे सूत्रांनी सांगितले. हे सर्व सुरू असतानाच वायकर यांनी हॉटेल बांधकाम नियमित करण्याबाबत पालिकेवर विनंती केली होती . परंतु पालिका ही विनंती सतत फेटाळत होती. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावरही पालिकेने कोणताही मार्ग काढण्यास नकार दिला होता. मात्र आता वायकर भाजपाचा सध्याचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाल्याने पालिकेने आजच्या न्यायालयाच्या सुनावणीत वायकर यांच्या तडजोडीच्या प्रस्तावावर विचार करण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगितले. त्यामुळे आता वॉशिंग मशीन मदतीला धावण्याची चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top