Santosh Deshmukh Case : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज (२१ फेब्रुवारी) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात पार पडली. या सुनावणीदरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत तीन वेळा चोरट्या मार्गाने आपल्या गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला असून, याबाबतची रीतसर माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपींकडून कुटुंबाला धोका-
धनंजय देशमुख यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तांत्रिक मागावर राहू नये म्हणून मोबाईलचा वापर टाळत आहे. मात्र, तो गावात येऊन जात असल्याने देशमुख कुटुंबात दहशतीचे वातावरण आहे. हे आरोपी ‘शैतानी वृत्तीचे’ असून त्यांच्यापासून आमच्या कुटुंबाच्या जीविताला मोठा धोका आहे. प्रशासनाने या आरोपीला तात्काळ बेड्या ठोकून त्याची जिल्ह्यातून धिंड काढावी, अशी संतप्त मागणी त्यांनी यावेळी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येला दीड वर्ष उलटूनही कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
न्यायालयीन कामकाजातील महत्त्वाचे टप्पे-
आजच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी पक्षाला सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील काही महत्त्वाच्या तांत्रिक घडामोडी खालीलप्रमाणे आहेत:
वकील बदलाचा अर्ज: आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. या अर्जावर सरकारी पक्ष आपले लेखी म्हणणे मांडणार आहे.
अपुऱ्या कागदपत्रांवरून आक्षेप: आरोपी वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी सरकारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लॅपटॉपची क्लोन कॉपी, फॉरेन्सिक अहवाल आणि पेन ड्राईव्ह अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याशिवाय साक्षीदारांची यादी स्वीकारू नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. तसेच, सरकारी पक्ष घाई का करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जामीन अर्ज व कॅव्हेट: येत्या २६ तारखेला सर्वोच्च न्यायालयात वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाने आधीच ‘कॅव्हेट’ दाखल केले असून, आपले म्हणणे सर्वोच्च न्यायालयात ठामपणे मांडणार असल्याचे स्पष्ट केले.
पुढील सुनावणी ६ मार्च रोजी-
आजच्या कामकाजात आरोपी जयराम चाटे यांच्या वतीने नवीन वकील एम. के. वाघीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विष्णू चाटे याच्या जेल बदलीच्या अर्जावर लवकरच निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाने आरोपी प्रतीक घुले यालाही वकिलाबाबत विचारणा केली असता, आगामी १०-१५ दिवसांत वकिलाची नियुक्ती केली जाईल, असे त्याने सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मार्च रोजी निश्चित केली आहे. दीड वर्षांपासून रेंगाळलेल्या या खटल्यात आता आरोपींना कधी शिक्षा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










