Mumbai–Pune Expressway toll refund – मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai–Pune Expressway) ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. या घटनेदरम्यान टोल भरावा लागलेल्या सुमारे १.२ लाख वाहनधारकांना एकूण अंदाजे ५.१६ कोटी रुपयांचा टोल परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत देण्यात येणार असून संबंधित वाहनचालकांच्या फास्टॅग (FASTag)खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.

३ फेब्रुवारीला नेमके काय घडले?
३ फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ (Khopoli) आडोशी बोगद्यानजीक प्रोपिलीन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला. गॅस गळतीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली. यामुळे एक्स्प्रेसवे तसेच आसपासच्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.
तब्बल २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि ३२ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. हजारो प्रवासी रस्त्यावर अडकून पडले. अनेकांना अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सुमारे एक लाखांहून अधिक लोक या कोंडीत अडकले होते.
या कोंडीत केवळ पर्यटकच नव्हते, तर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, वृद्ध आणि लहान मुलेही अडकली होती. मुंबईकडे उपचारासाठी जाणाऱ्या काही रुग्णवाहिका तासन्तास जागीच उभ्या राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिलांसाठी शौचालयाची किंवा सुरक्षित जागेची व्यवस्था नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
दरम्यान, एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’चे काम, सहा पदरी महामार्गाचे विस्तारीकरण आणि अटल सेतूमुळे प्रवास सुलभ झाल्याचे दावे केले जात असताना, या घटनेमुळे व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या.
मनसे आणि प्रशासनाची बैठक

अपघातानंतर प्रशासनाने तातडीने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तोपर्यंत काही वाहनधारकांच्या फास्टॅग खात्यांतून टोलची रक्कम वजा झाली होती. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खालापूर टोल नाक्यावर महत्त्वाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकारी, IRB Infrastructure Developers Limited चे प्रतिनिधी तसेच वाहतूक पोलिस अधिकारी उपस्थित होते. कोंडीदरम्यान घेतलेला टोल प्रवाशांना परत करण्याची ठाम मागणी मनसेने केली. आक्रमक भूमिकेनंतर आयआरबी कंपनीने टोल परत करण्याचे लेखी आश्वासन दिले.
सुविधांबाबतही प्रशासनाला इशारा
केवळ टोल परतावाच नव्हे, तर एक्स्प्रेसवेवरील मूलभूत सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छ प्रसाधनगृहांची व्यवस्था तसेच अवैध टोइंगच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
निर्देशानंतरही टोल कापला गेला
वाहतूक कोंडीची तीव्रता पाहून राज्य सरकारने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, FASTag ही स्वयंचलित प्रणाली असल्याने तांत्रिक कारणांमुळे अनेक वाहनचालकांच्या खात्यातून टोलचे पैसे कापले गेले. त्यानंतर विविध स्तरांतून टोल परत करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत MSRDC ने परताव्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
परतावा कसा मिळणार?
३ फेब्रुवारी रोजी एक्स्प्रेसवे तसेच पुणे–बेंगळुरू (Pune–Bengaluru highway)महामार्गावरील टोल नाक्यांवर ज्यांच्या फास्टॅग खात्यातून टोल कापला गेला, त्या वाहनधारकांना हा परतावा मिळणार आहे. संबंधित वाहनांचा डेटा आयआरबीकडून मागवण्यात आला असून ओळख पटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत हा परतावा थेट फास्टॅग खात्यात जमा होणार आहे.
पुन्हा खंडाळा परिसरात कोंडी
दरम्यान, खंडाळा घाट परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी(Traffic jam)झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. खंडाळा घाट ते आडोशी बोगदा दरम्यान सुरू असलेल्या ‘मिसिंग लिंक’च्या कामामुळे ही कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, एका महिन्यात सलग पाचव्यांदा या मार्गावर अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
सिंग लिंकवर सहा महिने अवजड वाहनांना बंदीची मागणी

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या किमान सहा महिन्यांसाठी केवळ प्रवासी (हलकी) वाहनेच या मार्गावर सोडावीत आणि अवजड वाहनांना तात्पुरती बंदी घालावी, अशी मागणी विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar i) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात असून हा राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि जागतिक दर्जाचा प्रकल्प मानला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होईल आणि अपघातांमध्येही घट होण्याची शक्यता आहे. तसेच बोर घाटातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
हा प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असल्याचे समजत असून, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदनही नार्वेकर यांनी पत्रात केले आहे.
नार्वेकर हे सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्यही आहेत. समिती सदस्य म्हणून त्यांनी मुख्यमंत्री यांना विनंती करताना म्हटले आहे की, हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे. बोर घाटातील खोल दऱ्या, हवेचा दाब, तसेच पावसाळा आणि दाट धुक्याचा परिसर लक्षात घेता सर्व तांत्रिक चाचण्या आणि संबंधित कामे पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरू करण्याची घाई करू नये. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
हे देखील वाचा –
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ नाराज
वाल्मिक कराडच्या मुलांपासून आम्हाला धोका’; महादेव मुंडेंच्या पत्नीची थेट एसपींकडे धाव











