Trump China Visit – जागतिक व्यापार तणाव आणि अमेरिका-चीन संबंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) ३१ मार्चपासून चीनच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग (Xi Jinping) यांच्याशी व्यापार, टॅरिफ आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. व्हाईट हाऊसकडून या दौऱ्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली असून जागतिक व्यापार, टॅरिफ युद्ध आणि इंडो-पॅसिफिक राजकारणाच्या दृष्टीने या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.ट्रम्प यांनी २०१७ मध्ये शेवटचा चीनचा दौरा केला होता. सध्या टॅरिफमुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध बिघडलेले आहेत.
अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव वाढलेला असतानाच ट्रम्प यांचा हा दौरा होत आहे. राजधानी बीजिंग Beijing येथे ट्रम्प चीनचे अध्यक्ष Xi Jinping यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, टॅरिफ, तंत्रज्ञान सहकार्य आणि आर्थिक संबंधांवर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.
ऑक्टोबरमध्ये South Korea येथे झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली प्रत्यक्ष समोरासमोर बैठक असणार आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाने लादलेले काही टॅरिफ बेकायदेशीर ठरवत रद्द केल्यानंतर हा दौरा जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाल्याचे मानले जाते.
ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याची घोषणा त्यांच्या संभाव्य भारत भेटीपूर्वी झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगल्या आहेत. विशेषतः Quadrilateral Security Dialogue (क्वाड) या भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या धोरणात्मक गटाच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
क्वाडचा मुख्य उद्देश मुक्त आणि सुरक्षित इंडो-पॅसिफिक क्षेत्र राखणे हा असला तरी चीनने या गटावर सातत्याने टीका केली आहे. त्यामुळे ट्रम्प प्रशासन चीनशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात क्वाडपासून काहीसे अंतर ठेवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असल्याने ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची बैठक जागतिक अर्थव्यवस्था, पुरवठा साखळी, तैवान प्रश्न आणि प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच चीन दौरा आहे.
दरम्यान, या भेटीत तैवानसंबंधी संवेदनशील मुद्दे, अमेरिकेकडून शस्त्रास्त्र विक्री आणि आशिया-प्रशांत क्षेत्रातील सामरिक संतुलन यावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत अमेरिका-चीन संबंधांची दिशा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हे देखील वाचा –
वाल्मिक कराडच्या मुलांपासून आम्हाला धोका’; महादेव मुंडेंच्या पत्नीची थेट एसपींकडे धाव
शरद पवार पुन्हा अॅडमिट ; हायड्रेशनचा त्रास
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राजकारण तापले; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार











