Home / महाराष्ट्र / Maharashtra Budget Session – अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राजकारण तापले; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Maharashtra Budget Session – अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राजकारण तापले; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Maharashtra Budget Session – राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय ( Budget Session) अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून, यंदाचे अधिवेशन राजकीय दृष्ट्या विशेष...

By: Team Navakal
Maharashtra Budget Session
Social + WhatsApp CTA

Maharashtra Budget Session – राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय ( Budget Session) अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून, यंदाचे अधिवेशन राजकीय दृष्ट्या विशेष ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतिहासात प्रथमच स्पष्टपणे विरोधी पक्षनेता नसलेल्या परिस्थितीत हे अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध प्रश्न आणि राज्यासमोरील समस्यांचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली असून मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार (Opposition boycotts tea meeting.) टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मुंबईतील शिवालय येथे Maha Vikas Aghadiची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, उबाठा आमदार Aaditya Thackeray, भास्कर जाधव, अनिल परब तसेच अमिन पटेल उपस्थित होते. मात्र या बैठकीत Sharad Pawar यांच्या गटाकडून कोणीही उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. महाविकास आघाडीत काही मतभेद आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला.

या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादीचे काही नेते मार्गावर आहेत आणि कम्युनिकेशन गॅपमुळे उशीर झाला आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र असून कोणताही मतभेद नाही, असे त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांच्याशी संपर्क झाला असून सुप्रिया सुळे यांनीही उशीर होणार असल्याची माहिती दिल्याचे जाधव यांनी नमूद केले.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधकांनी जाहीर केला आहे. भास्कर जाधव म्हणाले की, सरकारला प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सत्ताधारी विरोधकांचा सन्मान राखत नाहीत. लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही समान महत्त्वाचे घटक असतात. मात्र सरकारकडून तशी वागणूक मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच चहापान कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सरकारवर जोरदार टीका करत राज्यातील विविध प्रश्न मांडले. ग्रामीण आणि शहरी भागातील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांच्या कामांवर सरकारवर निशाणा साधला. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत योग्य भरपाई मिळाली का, असा सवाल त्यांनी केला.

मुलुंड परिसरात मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पॅरापेट भिंतीचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत सुविधांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत सरकारला जाब विचारला. अशा दुर्घटनांनंतर दिली जाणारी नुकसानभरपाई अपुरी असल्याची टीकाही त्यांनी केली.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्यातील शेतकरी प्रश्न, पायाभूत सुविधा, रोजगार, आर्थिक स्थिती आणि प्रशासनातील निर्णयप्रक्रिया या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.


Web Title:
संबंधित बातम्या