live cartridges – मुंबईतील IIT Bombay पवई कॅम्पसमध्ये (Powai campus) एका विद्यार्थ्याच्या बॅगेत ७.६५ मिमीची पाच जिवंत काडतुसे (cartridges)सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वसतिगृहात दोन विद्यार्थ्यांमध्ये (students)झालेल्या हाणामारीनंतर सुरक्षा रक्षकांनी खोल्यांची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी पोलिसांनी आनंद चौधरी (२३) या माजी विद्यार्थ्याला अटक केली आहे. अपूर्व मिश्रा हा आयआयटीमध्ये बीटेकच्या (B.Tech student) पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असून चौधरीनेच त्याच्या बॅगेत ही जिवंत काडतुसे ठेवली असल्याचा आरोप आहे. चौधरी मिश्रा याला भेटण्यासाठी कॅम्पसमध्ये आला असताना आयआयटीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर (investigation) त्याला पुढील तपासासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या खोल्यांची तपासणी केली असता मिश्राच्या बॅगेतून पाच जिवंत काडतुसे सापडली. ही काडतुसे तत्काळ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर पवई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने आनंद चौधरी यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चौधरीने मिश्राच्या बॅगेत काडतुसे का ठेवली, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत आल्यानंतर त्याने ही काडतुसे बॅगेत ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आयआयटी प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला भेट देण्यासाठी आलेल्या व्यक्तीनेच कॅम्पसमध्ये काडतुसे आणली होती. दोघेही बालपणीचे मित्र असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वसतिगृहात झालेल्या हाणामारीनंतर सुरक्षा तपासणी करण्यात आली आणि त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.या घटनेनंतर कॅम्पस सुरक्षा व्यवस्थेबाबतही चर्चा सुरू झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हे देखील वाचा –
सोने, Stock Market आणि राजकारणात मोठे बदल?
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच राजकारण तापले; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
पोलिसांच्या खाकीत व्हिडिओंवर बंदी ; विशेष शाखेचे कडक परिपत्रक











