Supriya Sule : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अडीच महिने उलटूनही तपासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ झालेल्या या भीषण अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असून, हा केवळ अपघात होता की एखादा पूर्वनियोजित घातपात, यावरून संशयाचे ढग गडद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्लॅक बॉक्सवरून विसंगत माहिती; तपासावर प्रश्नचिन्ह-
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या, “या अपघाताच्या ठिकाणी दादांचा (अजित पवार) फोन सापडतो, मात्र विमानातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा असलेला ‘ब्लॅक बॉक्स’ नेमका कुठे आहे? याबाबत अधिकृत यंत्रणांकडून विसंगत माहिती दिली जात आहे. कधी तो सापडला नसल्याचे सांगितले जाते, कधी सापडल्याचे म्हटले जाते, तर कधी तो आगीत जळून खाक झाल्याची चर्चा केली जाते. या विरोधाभासी माहितीमुळे तपासाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.”
गुन्हा दाखल न झाल्याबद्दल आश्चर्य-
या प्रकरणात सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी करताना सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले की, इतकी मोठी घटना घडूनही महाराष्ट्रात अद्याप याप्रकरणी गुन्हा का दाखल झाला नाही? आमदार रोहित पवार यांनीही यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन काही तांत्रिक पुरावे सादर केले होते आणि कर्नाटक येथे ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, ब्लॅक बॉक्समधील माहिती अधिक विश्लेषणासाठी परदेशात पाठवावी आणि सत्याचा शोध घ्यावा, अशी मागणी सुळे यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चारली.
अशोक खरात प्रकरण आणि राज्याची प्रतिमा-
बीड येथील अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी अत्यंत कडक शब्दांत निषेध नोंदवला. “अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राची मान शरमेने खाली जात आहे. या प्रकारांमुळे केवळ राज्यातच नव्हे, तर दिल्लीतही महाराष्ट्राची चेष्टा होत आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने हे वर्ष ‘सामाजिक परिवर्तन’ म्हणून साजरे करावे आणि मुलींच्या शिक्षणासह सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सुचवले.
राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी वर्तवलेली महागाई आणि बेरोजगारीबाबतची भाकिते आज खरी ठरत आहेत, असे त्या म्हणाल्या. “जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर आर्थिक संकटे उभी आहेत. राहुल गांधी निर्भयपणे जनतेचे प्रश्न मांडत असल्यानेच त्यांना सत्ताधाऱ्यांकडून लक्ष्य केले जात आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.











