Home / क्रीडा / RR vs RCB : एकटा वैभव संपूर्ण RCB ला नडला! राजस्थानचा बंगळुरूवर ६ गडी राखून दणदणीत विजय.

RR vs RCB : एकटा वैभव संपूर्ण RCB ला नडला! राजस्थानचा बंगळुरूवर ६ गडी राखून दणदणीत विजय.

RR vs RCB : आयपीएल २०२६ च्या सोळाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आपला धडाका कायम राखत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ६ गडी...

By: Team Navakal
RR vs RCB
Social + WhatsApp CTA

RR vs RCB : आयपीएल २०२६ च्या सोळाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आपला धडाका कायम राखत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या अटीतटीच्या लढतीत राजस्थानने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बंगळुरूची विजयाची मालिका खंडित केली. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून, गतविजेत्या आरसीबीला (RCB) हंगामातील पहिल्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

कर्णधार पाटीदारची एकाकी झुंज-
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात अत्यंत खराब झाली; वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने पहिल्याच चेंडूवर फिल साल्टला शून्यावर बाद करून मोठा धक्का दिला. पाठोपाठ देवदत्त पडिक्कलही (१४) स्वस्तात माघारी परतला. अनुभवी विराट कोहलीने १६ चेंडूत ३२ धावांची वेगवान खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मोठी खेळी करू शकला नाही. मध्यफळीतील फलंदाज अपयशी ठरत असताना कर्णधार रजत पाटीदारने ४० चेंडूत ६३ धावांची (४ चौकार, ४ षटकार) महत्त्वपूर्ण खेळी केली. वेंकटेश अय्यर (२९) आणि रोमारियो शेफर्ड (२२) यांच्या योगदानामुळे आरसीबीने २० षटकांत ८ बाद २०१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. राजस्थानकडून आर्चर, ब्रिजेश शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.

वैभव सूर्यवंशीचे वादळ आणि राजस्थानची घसरगुंडी-
२०२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने मैदानावर धावांचा पाऊस पाडला. सूर्यवंशीने अवघ्या २५ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ७८ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या स्फोटक फलंदाजीमुळे राजस्थानने केवळ ८ षटकांत १२९ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, वैयक्तिक ७८ धावांवर सूर्यवंशी बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव अचानक गडगडला. पाठोपाठ शिमरॉन हेटमायर (०) आणि कर्णधार रियान पराग (३) स्वस्तात बाद झाले. क्रुणाल पांड्याने एकाच षटकात दोन बळी मिळवून सामन्यात रंगत आणली. अवघ्या ५ धावांच्या अंतरात ३ महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्याने राजस्थानचा संघ काही काळ दबावाखाली आला होता.

ध्रुव जुरेलची ‘मॅच विनिंग’ खेळी-
सुरुवातीच्या वादळानंतर आलेल्या संकटातून ध्रुव जुरेलने राजस्थानला सावरले. जुरेलने अत्यंत परिपक्वता दाखवत एक बाजू लावून धरली. त्याने सुरुवातीला आक्रमक आणि नंतर संयमी फलंदाजी करत ४३ चेंडूंत नाबाद ८१ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ नेत्रदीपक षटकार खेचले. त्याला अनुभवी रवींद्र जडेजाने (२४ धावा) मोलाची साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करत १८ व्या षटकातच राजस्थानला विजय मिळवून दिला.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या