Home / क्रीडा / IPL Rules Breach Controversy: राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ! डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याने उडाली खळबळ

IPL Rules Breach Controversy: राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ! डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याने उडाली खळबळ

IPL Rules Breach Controversy: आयपीएल 2026 मध्ये सलग चार सामने जिंकून विजयाचा चौकार मारणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण...

By: Team Navakal
IPL Rules Breach Controversy
Social + WhatsApp CTA

IPL Rules Breach Controversy: आयपीएल 2026 मध्ये सलग चार सामने जिंकून विजयाचा चौकार मारणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या गोटात सध्या चिंतेचे वातावरण आहे. गुवाहाटी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर चक्क डगआउटमध्ये बसून मोबाईल वापरताना दिसत आहेत, जे आयपीएलच्या नियमांचे गंभीर उल्लंघन मानले जाते.

नेमकं प्रकरण काय?

राजस्थान रॉयल्सच्या डावातील 11 व्या षटकात ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. राजस्थानचे मॅनेजर रोमी भिंदर हे डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरत असल्याचे स्पष्ट दिसत होते. विशेष म्हणजे, त्यांच्या बाजूला बसलेला खेळाडू वैभव सूर्यवंशी हा देखील त्या मोबाईल स्क्रीनकडे बघत असल्याचे व्हिडिओत दिसून आले. आयपीएलच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांनुसार, खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाला डगआउटमध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करण्यास मनाई आहे.

काय सांगतो आयपीएलचा नियम?

आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार, ‘प्लेअर आणि मॅच ऑफिशिअल एरिया’ (PMOA) मध्ये मोबाईल फोन किंवा कोणत्याही संवादाच्या साधनांचा वापर करणे प्रतिबंधित आहे.

  • प्रतिबंधित क्षेत्र: ड्रेसिंग रूम, डगआउट, मॅच रेफरीची खोली आणि खेळाडूंचे जेवणाचे ठिकाण या क्षेत्रांत फोन वापरता येत नाही.
  • अपवाद: केवळ टीम अॅनॅलिस्टला त्यांच्या ठराविक टेबलवर लॅपटॉप किंवा टॅबलेट वापरण्याची परवानगी असते.
  • मॅनेजरसाठी नियम: टीम मॅनेजर ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरू शकतात, परंतु डगआउटमध्ये मोबाईल वापरणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

ललित मोदींची आक्रमक भूमिका

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विचारले की, “डगआउटमध्ये मोबाईल फोन असणे हे नियमांच्या विरोधात आहे. हे खरोखरच घडले आहे का? जर असे झाले असेल, तर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने यावर तात्काळ कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.” बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी अधिकारी याकडे दुर्लक्ष कसे करू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मैदानावर अजेय राहिलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी हा वाद डोकेदुखी ठरू शकतो. आता या प्रकरणी बीसीसीआय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या