Home / महाराष्ट्र / Pratibha Chakankar : ८ तासांची मॅरेथॉन चौकशी आणि प्रश्नांची सरबत्ती! अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांनी पोलिसांना नेमकं काय सांगितलं?

Pratibha Chakankar : ८ तासांची मॅरेथॉन चौकशी आणि प्रश्नांची सरबत्ती! अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांनी पोलिसांना नेमकं काय सांगितलं?

Pratibha Chakankar : नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता केवळ अंधश्रद्धेपुरती मर्यादित न राहता, मोठ्या आर्थिक...

By: Team Navakal
Pratibha Chakankar
Social + WhatsApp CTA

Pratibha Chakankar : नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती आता केवळ अंधश्रद्धेपुरती मर्यादित न राहता, मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांकडे वळली आहे. या प्रकरणात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि त्यांच्या सख्ख्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्याभोवती तपासाचा फास आवळला जात आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांची तब्बल आठ तास प्रदीर्घ चौकशी केली. या चौकशीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खरातच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे आता अधिकृतरीत्या समोर येऊ लागले आहेत.

प्रतिभा चाकणकर यांचा ‘बनावट खात्यां’चा दावा आणि ८ तासांची चौकशी-
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण ४ बँक खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये दोन खाती स्वतः प्रतिभा यांच्या नावे, तर दोन खाती त्यांच्या मुलांच्या नावे आहेत. या खात्यांमधून २ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. ८ तासांच्या चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “आम्ही कधीही समता पतसंस्थेत गेलो नाही किंवा तिथे खाते उघडले नाही. ही खाती पूर्णपणे बनावट असून त्यावरील स्वाक्षऱ्याही आमच्या नाहीत. बँक खात्यावर दिलेला पत्ताही चुकीचा आहे,” असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाच्या सत्यतेसाठी प्रतिभा आणि तन्मय यांनी आपल्या स्वाक्षऱ्यांचे नमुने पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.

कायदेशीर बाजू आणि वकिलांची भूमिका-
प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी स्पष्ट केले की, चाकणकर कुटुंबीयांना पोलिसांची कोणतीही अधिकृत नोटीस मिळाली नव्हती, परंतु माध्यमांमधील बातम्या पाहून ते स्वतःहून जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले. कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्यांमध्ये फेरफार करून ही बनावट खाती उघडण्यात आली असल्याचा त्यांचा प्राथमिक आक्षेप आहे. पतसंस्थेतील व्यवहारांशी त्यांचा कोणताही संबंध नसून, तपासात पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, कोट्यवधींचे व्यवहार कोणाच्या सांगण्यावरून झाले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

ईडी आणि आयकर विभागाची देशव्यापी कारवाई-
दुसरीकडे, अशोक खरात प्रकरण आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) नाशिक, पुणे आणि शिर्डी या तिन्ही शहरांमध्ये एकाच वेळी छापेमारी करत तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. शिर्डीतील समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ईडीच्या पथकाने धडक दिली असून, अशोक खरात नॉमिनी असलेल्या सुमारे १०० बँक खात्यांची तपासणी सुरू आहे. या खात्यांमधून तब्बल ६० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त, नाशिकमधील खरातच्या ‘तृप्तबाला’ या निवासस्थानी आयकर विभागानेही छापा टाकला असून, मालमत्ता खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची कसून पडताळणी केली जात आहे.

अशोक खरात याच्या माध्यमातून सत्तेच्या जवळ असलेल्या व्यक्तींनी काळा पैसा पांढरा केला आहे का, किंवा या भोंदूगिरीच्या आडून मोठे आर्थिक रॅकेट चालवले जात होते का, याचा शोध आता ईडी आणि आयकर विभाग घेत आहे. नाशिकमध्ये ५, पुण्यात ३ आणि शिर्डीत ३ ठिकाणी सुरू असलेल्या या छाप्यांमुळे खरातचे आर्थिक हितसंबंध असलेल्या बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या