Home / देश-विदेश / US-IRAN : अमेरिकेने इराणला घेरले ! शांततेचाही प्रयत्न ! उद्या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक होणार

US-IRAN : अमेरिकेने इराणला घेरले ! शांततेचाही प्रयत्न ! उद्या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक होणार

US-IRAN : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इशारा दिल्यानुसार त्यांनी आजपासून इराणला घेरण्यास सुरूवात केली. अमेरिकेच्या 15 अजस्र...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 US-IRAN : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इशारा दिल्यानुसार त्यांनी आजपासून इराणला घेरण्यास सुरूवात केली. अमेरिकेच्या 15 अजस्र युद्धनौकांनी इराणला चहुबाजूंनी वेढा घातला आहे. या युद्घनौकांवर एफ 35 लढाऊ विमाने तैनात आहेत. कोणत्याही क्षणी हल्ला करण्यासाठी ही विमाने सज्ज आहेत. दुसरीकडे इराणनेही आपल्या एकाही बंदरावर हल्ला झाला तर फारसची खाडी आणि ओमानच्या सागरी हद्दीतील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही,असा सज्जड इशारा अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे युद्ध चिघळण्याची चिन्हे दिसत असताना आशेचा किरणही दिसला. अमेरिका आणि इराण दरम्यान गुरुवारी चर्चेची दुसरी फेरी  होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कायमस्वरूपी युद्धविराम करण्यासाठी होणारी ही बैठक बर्‍यापैकी यशस्वी होईल, असा दावाही केला जात आहे.


अमेरिका इराणकडे जाणार्‍या आणि इराणमधून बाहेर पडणार्‍या एकाही जहाजाला नाकेबंदीतून जाऊ देणार नाही, असा इशारा आज ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प यांनी कालच स्पष्ट केले होते की, नाकेबंदीमधून इराणशी व्यापारी संबंध ठेवणार्‍या अन्य देशांच्या जहाजांनाही सवलत दिली जाणार नाही. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे चीन नाराज झाला आहे. चीन हा इराणकडून कच्चे तेल घेणारा एक मोठा ग्राहक देश आहे. चीनने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे की, इराणसोबत आमचे पुर्वीपासूनचे व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे अमेरिकेने आमच्या अंतर्गत मामल्यामध्ये ढवळाढवळ आम्ही खपवून घेणार नाही.


दरम्यान, युद्धविरामाच्या चर्चेबद्दल बोलताना इराण सरकारचे प्रवक्ते फातेमेह मोहाजेरानी यांनी सांगितले की, आम्हाला शांतता हवी आहे. परंतु आमच्या काही अटी आहेत. युरेनियम समृद्धीकरणाचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. त्यावर लावलेले सर्व निर्बंध उठवले गेले पाहिजे. त्याचबरोबर अमेरिका आणि इस्रायलने गेल्या महिन्याभरात आमच्या देशावर केलेल्या हल्ल्यांमुळे आमचे सुमारे 270 अब्ज डॉलरचे (सुमारे 25 लाख कोटी रुपये) नुकसान झाले आहे. त्याची भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे.


तिकडे चीनची राजधानी बीजिंगमध्ये आज संयुक्त अरब अमिरातींतील अबू धाबीचे राजपुत्र शेख खालिद बिन मोहम्मद बिन जाएद अल नाहयान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली. या भेटीत जिनपिंग यांनी नाहयान यांच्यासमोर मध्य पूर्वेतील शांततेसाठी चार सुत्री प्रस्ताव दिला. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने याबाबतचे वृत्त दिले. त्यानुसार बैठकीत जिनपिंग यांनी सांगितले की, मध्य पूर्वेत शांतता राखण्यासाठी शांततापूर्ण सह अस्तित्वाच्या सिद्धांताचे पालन होणे आवश्यक आहे. मध्य पूर्व आणि आखाती देशांनी एकत्रितपणे व्यापक आणि टिकाऊ सुरक्षा आराखडा तयार  करावा, असा आग्रह जिनपिंग यांनी धरला. आंतरराष्ट्रीय कायद्याचे तत्त्व पाळणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा जगाची पुन्हा एकदा ’बळी तो कान पिळी’सारख्या व्यवस्थेकडे वाटचाल सुरू होईल,असेही जिनपिंग यांनी सांगितले.

मोदी – ट्रम्प यांच्यात 40 मिनिटे चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात सुमारे 40 मिनिटे फोनवर चर्चा झाली. अमेरिका-इराण युद्धविरामानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच चर्चा होती. तर 20 दिवसांतील त्यांच्यातील ही दुसरी चर्चा आहे. या चर्चेविषयी मोदी यांनी एक पोस्ट करून म्हटले की, माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला. आम्ही विविध क्षेत्रांतील आमच्या द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या भरीव प्रगतीचा आढावा घेतला. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आमची व्यापक जागतिक सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केली आणि होर्मुजची सामुद्रधुनी खुली व सुरक्षित ठेवण्यावर भर दिला.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या