Nishant Kumar : बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री होणार आहे. दोन वेळा उपमुख्यमंत्री असलेले भाजपाचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या सकाळी 11 वाजता लोकभवनात शपथ घेतील. जदयूचे नीतीशकुमार यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटची कॅबिनेट बैठक आज घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. राज्यपालांनी तो स्वीकारला. नीतीशकुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. नीतीशकुमार यांच्यानंतर त्यांचे पुत्र मुख्यमंत्री होतील अशी जदयूच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.
आज भाजपा विधानमंडळ सदस्य बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते विजय सिन्हा यांनी विधानमंडळ पक्ष नेतेपदी सम्राट चौधरी यांचे नाव प्रस्तावित केले. त्यानंतर रेणु देवी, मंगल पांडेय, दिलीप जायसवाल यांसह इतर आमदारांनी त्यास मंजुरी दिली आणि सम्राट चौधरी यांची सर्वानुमते निवड झाली. राजद, जदयू आणि भाजपा असा प्रवास करत भाजपात आलेले सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपा पहिल्यांदाच बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री देत आहे.
विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड झाल्यानंतर सम्राट चौधरी यांनी भाजपाच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, गेल्या 20 वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय आहे, पण यापूर्वी कोणतीही ठोस विचारधारा नव्हती. 2015 मध्ये मला भाजपामध्ये सामील होण्याची संधी मिळाली. त्यानंतर पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली. मला पक्षात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला. बिहारमध्ये जदयू व भाजपा असे एनडीएचे सरकार स्थापन झाल्यावर मला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. 2025 मध्ये पुन्हा एनडीएची सरकार आल्यावर मला गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आज मला पुन्हा एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे आणि मी ती पूर्ण करीन.
भाजपाचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, नीतीश कुमार यांनी 20 वर्षे बिहारची सेवा केली आणि राज्याचा चेहरामोहरा बदलला. त्यांनी बिहारला ‘जंगलराज’पासून मुक्त केले. त्यांच्या कार्याचे उदाहरण संपूर्ण भारत देत आहे. त्यांनी मुलींना सायकली दिल्या, महिलांना आरक्षण दिले, दारूबंदी धोरण लागू केले आणि देशातील पहिले कृषी रोडमॅप आणले. आता सम्राट चौधरी हे त्यांचे काम अधिक वेगाने पुढे नेतील.











