Nida Khan : नाशिकमधील ‘टीजीएस’ (TCS) या नामांकित आयटी कंपनीत समोर आलेल्या लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि कंपनीची एचआर (HR) अधिकारी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये सुमारे एक तास रंगलेल्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर, न्यायालयाने या अर्जावरील पुढील सुनावणी २७ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.
न्यायालयाचा अंतरिम दिलासा देण्यास नकार-
मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान सध्या फरार असून तिने आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आजच्या सुनावणीत निदा खानच्या वकिलांनी तिला ‘अंतरिम संरक्षण’ (Interim Protection) देण्याची विनंती केली होती, मात्र न्यायालयाने तिला कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ असा की, पोलीस निदा खानला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात. पीडितेचे वकील आणि सरकारी पक्ष २७ एप्रिल रोजी आपला युक्तिवाद मांडणार असून, त्याच दिवशी निदा खानच्या जामिनाबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
निदा खानच्या वकिलांचा युक्तिवाद-
निदा खानचे वकील ॲड. राहुल कसलीवाल यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, “निदा खान ही मूळची आरोपी नसून केवळ प्रसारमाध्यमांमध्ये नाव आल्यामुळे पोलिसांनी तिला या प्रकरणात ओढले आहे. मुख्य फिर्यादी आणि निदा खान यांच्यात मैत्रीचे संबंध होते. या प्रकरणाला अनावश्यक धार्मिक रंग दिला जात असून, फिर्यादीत कोणत्याही धर्माच्या प्रशिक्षणाचा उल्लेख नाही.” निदा खान सध्या गरोदर असल्याचे सांगत, मानवतावादी दृष्टिकोनातून जामीन मिळावा, असा प्रयत्नही बचाव पक्षाकडून करण्यात आला.
कंपनीची कठोर भूमिका आणि पोलिसांचा शोध-
हे गंभीर प्रकरण उघडकीस येताच कंपनी प्रशासनाने निदा खानवर निलंबनाची कारवाई केली आहे. २७ डिसेंबर २०२१ पासून कार्यरत असलेल्या निदाचा कंपनीच्या नेटवर्क आणि सिस्टीममधील प्रवेश तातडीने बंद करण्यात आला असून, तिला कार्यालयीन मालमत्ता परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, नाशिक पोलिसांनी निदा खानच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. पोलिसांनी तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी, निदा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
धर्मांतर रॅकेटच्या मास्टरमाइंडवर लक्ष-
नाशिकमधील या कथित धर्मांतर रॅकेटची ‘मास्टरमाइंड’ म्हणून निदा खानचे नाव समोर आल्याने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. फिर्यादीत अट्रोसिटी (Atrocity) कलमांचाही अंतर्भाव करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.










