Cab Drivers on Strike : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील ॲप-आधारित टॅक्सी चालकांच्या संघटनेने आज, सोमवार (२० एप्रिल २०२६) पासून दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर बेमुदत संपाची हाक दिली आहे. ‘आमरण उपोषण’ (Fast Unto Death) पुकारत चालक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने मुंबईसह संपूर्ण राज्यातील टॅक्सी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रमुख मागण्या आणि आंदोलनाचे कारण-
या आंदोलनाच्या केंद्रस्थानी दोन प्रमुख मागण्या आहेत. पहिली म्हणजे, नियमांचे उल्लंघन करून चालवल्या जाणाऱ्या अनधिकृत ‘बाईक टॅक्सी’ सेवांवर तातडीने बंदी घालणे. दुसरी मागणी म्हणजे, परिवहन विभागाने निश्चित केलेल्या भाडेरचनेची (Fare Structure) अंमलबजावणी ओला आणि उबर सारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांनी काटेकोरपणे करावी. चालकांचा असा आरोप आहे की, राज्य सरकारने वेळोवेळी आदेश देऊनही बहुराष्ट्रीय कंपन्या या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे सामान्य चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
महाराष्ट्रभर आंदोलनाचे लोण-
हे आंदोलन केवळ मुंबईपुरते मर्यादित राहिलेले नाही. ओला आणि उबरशी जोडलेले हजारो चालक या संपात सहभागी झाले असून, पुणे आणि नागपूर येथेही तीव्र निदर्शने केली जात आहेत. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तर नागपुरात संविधान चौक येथे चालकांनी एकत्र येत आपला निषेध नोंदवला आहे. “जोपर्यंत सरकार या अनधिकृत सेवांवर कायमस्वरूपी बंदी घालत नाही किंवा कठोर नियमावली लागू करत नाही आणि आम्हाला तसे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा निर्धार चालक संघटनांनी व्यक्त केला आहे.










