Sanju Samson Records: आयपीएल 2026 मधील ‘एल क्लासिको’ सामन्यात संजू सॅमसनने केवळ शतकी खेळीच केली नाही, तर विक्रमांचा डोंगरही उभा केला. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवताना संजूने अशा काही नोंदी केल्या आहेत, ज्या आजवर कोणत्याही चेन्नईच्या फलंदाजाला जमल्या नव्हत्या. त्याच्या या कामगिरीमुळे क्रिकेट जगतात सध्या केवळ संजूचीच चर्चा आहे.
Sanju Samson Records: संजू सॅमसनने प्रस्थापित केलेले ऐतिहासिक विक्रम:
1. मुंबईविरुद्ध शतक ठोकणारा पहिला चेन्नईकर : आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावणारा संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्सचा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ऋतुराज गायकवाडच्या नावावर 88 धावांचा विक्रम होता, जो संजूने मोडीत काढला.
2. केएल राहुलच्या विक्रमाशी बरोबरी : संजू सॅमसनने आता आयपीएलमध्ये एकूण 5 शतके पूर्ण केली आहेत. यासह त्याने केएल राहुलच्या ५ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो आता सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
3. यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके : यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक 3 शतके ठोकण्याचा विक्रम संजूने केला आहे. या बाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
4. एकाच हंगामात दोन शतके : संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्ससाठी एकाच आयपीएल हंगामात दोन शतके ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, केवळ 7 सामन्यांमध्ये त्याने हा पराक्रम करून दाखवला आहे.
5. रोहित शर्माच्या क्लबमध्ये एन्ट्री : टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 8 शतके ठोकून संजूने रोहित शर्माची बरोबरी केली आहे. भारतीयांमध्ये आता त्याच्या पुढे केवळ विराट कोहली आणि अभिषेक शर्मा (9 शतके) आहेत.
चेन्नई सुपर किंग्सच्या इतिहासात दोन किंवा त्यापेक्षा जास्त शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या मोजक्या यादीत (मुरली विजय, सुरेश रैना, शेन वॉटसन आणि ऋतुराज गायकवाड) आता संजूनेही स्थान मिळवले आहे.
हे देखील वाचा –











