Paytm Payments Bank License Cancelled : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या पेटीएमला (Paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दणका दिला आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना अधिकृतपणे रद्द केला असून, या बँकेला आता बँकिंगशी संबंधित कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात आरबीआयने स्पष्ट केले की, पेटीएम पेमेंट्स बँकेकडे तिच्या ग्राहकांचे पैसे परत करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे.
Paytm Payments Bank License Cancelled : आरबीआयने का उचलले हे पाऊल?
पेटीएम पेमेंट्स बँकेवर ही कारवाई अचानक झालेली नाही. या बँकेच्या कारभारात अनेक त्रुटी असल्याचे आरबीआयला आढळून आले होते. परवाना रद्द करण्यामागे आरबीआयने काही प्रमुख कारणे दिली आहेत:
- बँकेचे व्यवस्थापन आणि कामकाजाची पद्धत ही ठेवीदारांच्या आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात होती.
- पेमेंट बँक परवाना मिळवताना ज्या अटी घालण्यात आल्या होत्या, त्यांचे पालन करण्यास बँक अपयशी ठरली.
- वारंवार सूचना देऊनही बँकेच्या कारभारात सुधारणा दिसून आली नाही.
आरबीआयने म्हटले आहे की, या बँकेला यापुढे कामकाज सुरू ठेवण्याची परवानगी देणे कोणाच्याही हिताचे नाही. त्यामुळे बँक बंद करण्याची (Winding-up) प्रक्रिया सुरू करण्यासाठी आरबीआय आता उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे.
Paytm Payments Bank License Cancelled : 2022 पासून सुरू होती कारवाईची प्रक्रिया
पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने 11 मार्च 2022 रोजी नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घालून कारवाई सुरू केली होती. त्यानंतर 2024 मध्ये बँकेच्या खात्यांमध्ये नवीन ठेवी स्वीकारणे, क्रेडिट आणि वॉलेट टॉप-अप करण्यावरही कडक निर्बंध लादले होते. विजय शेखर शर्मा यांनी 2017 मध्ये या बँकेची स्थापना केली होती, जिचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे.
या निर्णयामुळे पेटीएमच्या बँकिंग सेवा पूर्णपणे ठप्प होणार असल्या तरी, रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना आश्वस्त केले आहे की त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. ज्यांचे पैसे अद्याप बँकेत अडकलेले आहेत, त्यांना ते परत मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
हे देखील वाचा – AAP Rajya Sabha MPs Resign : ‘आप’ सोडली तरी खासदारकी का जाणार नाही? जाणून घ्या राघव चड्ढा आणि 6 खासदारांच्या ‘सेफ गेम’मागचे गणित










