MHADA Pune Lottery: पुण्यात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 295 निवासी सदनिकांच्या विक्रीसाठी ‘आधी येणाऱ्यास प्राधान्य’ ही योजना जाहीर केली आहे.
या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 4 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
MHADA Pune Lottery: कुठे आणि किती घरे उपलब्ध?
या योजनेअंतर्गत एकूण 295 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही घरे म्हाडाच्या 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण आणि 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील विक्रीविना राहिलेली आहेत.
- पुणे महानगरपालिका क्षेत्र: 113 सदनिका.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र: 182 सदनिका.
ही घरे चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोली, बालेवाडी, हडपसर आणि पुनावळे यांसारख्या विकसित भागांत आहेत. यामध्ये 1 आरके, 1 बीएचके आणि 2 बीएचके अशा विविध पर्यायांचा समावेश आहे.
MHADA Pune Lottery: अर्ज शुल्क आणि अनामत रक्कम
अल्प उत्पन्न गट (LIG) आणि अत्यल्प उत्पन्न गट (EWS) मधील अर्जदारांसाठी सुरुवातीचा खर्च खालीलप्रमाणे असेल:
- अनामत रक्कम: 20,000 रुपये.
- अर्ज शुल्क: 600 रुपये.
- जीएसटी: 108 रुपये.
- एकूण रक्कम: 20,708 रुपये. नियमनानुसार अनामत रक्कम परत मिळू शकते, मात्र त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
MHADA Pune Lottery: पात्रतेचे निकष काय?
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा गेल्या 20 वर्षांपैकी किमान 15 वर्षे राज्यात वास्तव्य केलेले असावे.
- आर्थिक वर्ष 2024–25 आणि 2025–26 चा उत्पन्नाचा पुरावा असणे अनिवार्य आहे.
- अर्जासोबत अचूक बँक तपशील आणि आयएफएससी कोड देणे आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना
म्हाडाने स्पष्ट केले आहे की ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक आहे. यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची किंवा एजंटची गरज नाही. सर्व अधिकृत संवाद ईमेल आणि एसएमएसद्वारे केला जाईल. जर एखाद्या अर्जदाराने सदनिका मिळाल्यानंतर ती नाकारली किंवा अर्ज मागे घेतला, तर घराच्या एकूण किमतीच्या 1 टक्के रक्कम वजा केली जाईल.
मदतीसाठी अर्जदार आगरकर नगर, पुणे येथील म्हाडा लॉटरी मदत केंद्राशी किंवा 020-26128856 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
हे देखील वाचा –
Sai Sudharsan Record: साई सुदर्शनने रचला इतिहास! ख्रिस गेलचा ‘तो’ मोठा विक्रम मोडला










