Tanvi Kolte: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सिझनचा पडदा पडला असला, तरी या शोमधील स्पर्धकांची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. या सिझनची विजेती ठरलेल्या तन्वी कोलतेने राकेश बापट आणि विशाल कोटियन यांसारख्या दिग्गज स्पर्धकांना तगडी टक्कर देत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सध्या तन्वी तिच्या विजयामुळे चर्चेत असतानाच, सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
“करिअर हेच माझं पहिलं प्रेम”
बिग बॉसच्या घरात असताना तन्वी अनेकदा वादाच्या प्रसंगी आपल्या लग्नाचा विषय काढायची. “मला घराबाहेर पडल्यावर लग्न करायचे आहे, त्यामुळे माझ्याबद्दल काहीही बोलू नका,” असे ती स्पर्धकांना सांगायची.
मात्र, आता प्रत्यक्ष बाहेर आल्यावर तिचे मत बदलले आहे का? असा प्रश्न विचारला जात होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तन्वीने यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ती म्हणाली की, “सध्या मला कोणा मुलाशी नाही, तर माझ्या करिअरशी लग्न करायचे आहे. कामावर लक्ष केंद्रित करणं ही माझी पहिली प्राथमिकता आहे.”
घरात ‘लव्ह अँगल’ का ठेवला नाही?
शोदरम्यान अनेकदा स्पर्धकांमध्ये अफेअरच्या चर्चा रंगतात, पण तन्वी यापासून लांब राहिली. यावर भाष्य करताना ती म्हणाली, “मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की मला गेममध्ये कोणतंही अफेअर करायचं नाही. अवघ्या ३ महिन्यांत कोणाशी तरी प्रेम होईल, यावर माझा विश्वास नाही. मी एकटीच खेळणार आणि एकटीच बाहेर पडणार हे माझं ठरलं होतं आणि मी ते करून दाखवलं.”
आई सांगेल त्याच मुलाशी करणार लग्न!
स्वतःला ‘जुन्या विचारांची’ म्हणवून घेणाऱ्या तन्वीने आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दलही एक महत्त्वाची अट सांगितली आहे. “लोक मला फटकळ समजत असले, तरी मी माझ्या संस्कारांना धरून आहे. माझी आई ज्या मुलाला पसंत करेल, त्याच्याशीच मी लग्न करेन,” असे सांगून तिने घरच्यांच्या निर्णयाला सर्वोच्च स्थान दिले आहे.
सध्या तन्वी आपल्या विजयाचं सेलिब्रेशन करत असून, आगामी काळात ती कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.
हे देखील वाचा –











