Vaibhav Sooryavanshi: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर शनिवारी क्रिकेट चाहत्यांना एका नव्या ताऱ्याचा उदय पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्सच्या अवघ्या १५ वर्षे २९ दिवस वय असलेल्या वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या ३७ चेंडूत १०३ धावांची अविश्वसनीय खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली आहे.
Vaibhav Sooryavanshi Records: वैभव सूर्यवंशीने रचलेले ऐतिहासिक विक्रम:
१. आयपीएलमधील तिसरे वेगवान शतक: वैभवाने केवळ ३६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील हे तिसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. ख्रिस गेल (३० चेंडू) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर खुद्द वैभवाने गेल्या वर्षी गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकले होते.
२. सर्वात कमी वयात १००० टी-२० धावा: वयाच्या १५ व्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार करणारा वैभव जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यासोबतच सर्वात कमी चेंडूत (४७३ चेंडू) १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रमही आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.
३. एका डावात सर्वाधिक १२ षटकार: हैदराबादविरुद्धच्या डावात वैभवाने १२ गगनभेदी षटकार लगावले. आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुरली विजयने २०१० मध्ये ११ षटकार मारले होते.
४. ४० पेक्षा कमी चेंडूत दोन शतके: आयपीएलच्या इतिहासात ४० पेक्षा कमी चेंडूत दोन शतके झळकावणारा वैभव हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात केवळ ८ खेळाडूंनी ४० चेंडूंच्या आत शतकी खेळी केली आहे.
५. राजस्थान रॉयल्ससाठी विशेष कामगिरी: एकापेक्षा जास्त शतके झळकावणारा तो राजस्थान रॉयल्सचा सहावा खेळाडू ठरला आहे. जोस बटलर (७ शतके) या यादीत अग्रस्थानी आहे, तर संजू सॅमसन, अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जैस्वाल यांच्याकडे प्रत्येकी २ शतके आहेत.
सामन्याचा निकाल:
वैभवच्या १०३ धावांच्या जोरावर राजस्थानने २२८ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी हा सामना ५ गडी राखून जिंकला. ईशान किशन (७४ धावा) आणि अभिषेक शर्मा (५७ धावा) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांमुळे हैदराबादने २२९ धावांचे आव्हान यशस्वीपणे पार केले. जरी राजस्थानचा पराभव झाला असला, तरी वैभव सूर्यवंशीच्या रेकॉर्डब्रेक खेळीने क्रीडाविश्व अवाक झाले आहे.
हे देखील वाचा – KL Rahul Record: केएल राहुलचा धमाका! आयपीएलमध्ये १५० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय; मोडला १५ वर्षांपूर्वीचा विक्रम











