UAE OPEC Exit: जागतिक ऊर्जा बाजारपेठेत सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) ‘ओपेक’ (OPEC) या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.
1 मे पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे युएई आता सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील उत्पादन मर्यादांपासून मुक्त झाला आहे. याचा थेट सकारात्मक परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर आणि किमतींवर होण्याची शक्यता आहे.
UAE OPEC Exit: भारताला कसा होणार फायदा?
भारत आपल्या गरजेच्या सुमारे 9 ते 10 टक्के कच्चे तेल युएईकडून आयात करतो. ओपेकच्या नियमांनुसार, युएईला आपली क्षमता असूनही तेल उत्पादनावर मर्यादा ठेवाव्या लागत होत्या. आता ही मर्यादा संपल्यामुळे युएई दररोज सुमारे 10 लाख बॅरल अतिरिक्त तेल उत्पादन करू शकतो. भारतासाठी ही मोठी संधी आहे, कारण यामुळे देशाला भविष्यात अधिक प्रमाणात आणि कदाचित स्वस्त दरात कच्चे तेल उपलब्ध होईल.
UAE OPEC Exit: ‘फुजैरा’ पाईपलाईन: भारतासाठी सुरक्षित मार्ग
सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावामुळे ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग धोक्याचा बनला आहे. जगातील 20 टक्के तेल याच मार्गाने वाहून नेले जाते. मात्र, युएईकडे ‘हबशान-फुजैरा’ ही 400 किलोमीटर लांबीची विशेष पाईपलाईन आहे.
- ही पाईपलाईन हॉर्मुझच्या धोक्याच्या मार्गाला पूर्णपणे बगल (Bypass) देते.
- या माध्यमातून युएई थेट अरबी समुद्रात तेल पोहोचवू शकतो, जिथून भारताला तेल मिळवणे अत्यंत सोपे आणि सुरक्षित आहे.
- ओपेकच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे आता या पाईपलाईनमधून अधिक क्षमतेने तेल भारताकडे पाठवले जाऊ शकते.
UAE OPEC Exit: युएईचा स्वाभिमानी निर्णय
गेल्या अनेक वर्षांपासून युएईने आपल्या तेल क्षेत्रात 150 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. त्यांची तेल उत्पादन क्षमता दिवसाला 50 लाख बॅरलपर्यंत पोहोचली आहे, तरीही ओपेकच्या नियमांमुळे त्यांना केवळ 34 लाख बॅरलपर्यंतच मर्यादित राहावे लागत होते. आपली ही गुंतवणूक आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन युएईने संघटनेतून बाहेर पडण्याचा सार्वभौम निर्णय घेतला आहे.
UAE OPEC Exit: भारत-युएई मैत्री होणार अधिक घट्ट
भारत आणि युएई दरम्यान आधीच धोरणात्मक भागीदारी असून दोन्ही देशांमधील व्यापार 200 अब्ज डॉलर्सच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. युएई हा भारताचा विश्वासू ऊर्जा भागीदार आहे. आता ओपेकच्या कोट्यातून बाहेर पडल्यामुळे, युएई भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची तेलाची गरज अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकेल.
हे देखील वाचा –
Fuel Price Update: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण











