Astro-Tourism in Maharashtra: खगोलप्रेमी आणि निसर्गवेड्या पर्यकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक अनोखी पर्वणी आणली आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने (MTDC) पहिल्यांदाच समर्पित ‘ॲस्ट्रो-टुरिझम’ म्हणजेच खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी पाऊल उचलले आहे.
‘आंतरराष्ट्रीय डार्क स्काय वीक’चे औचित्य साधून लोणार आणि हरिहरेश्वर या दोन वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी खगोल दर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोणार आणि हरिहरेश्वरच का?
१. लोणार सरोवर: उल्कापातामुळे तयार झालेले हे जगातील एकमेव विवर भौगोलिक आणि खगोलशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. विवराच्या परिसरातून ताऱ्यांचे निरीक्षण करणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.
२. हरिहरेश्वर: कोकण किनारपट्टीवर असलेल्या हरिहरेश्वरमध्ये कृत्रिम प्रकाशाचा अडथळा म्हणजेच प्रकाश प्रदूषण खूप कमी आहे. यामुळे रात्रीचे आकाश अतिशय स्पष्ट दिसते, जे ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी सर्वोत्तम आहे.
राज्याचे नवीन ‘डार्क स्काय’ धोरण
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा उपक्रम राबवला जात आहे. राज्य सरकारने खगोल पर्यटनासाठी एकूण 11 ठिकाणे निश्चित केली असून, तिथे कृत्रिम प्रकाश कमी करून नैसर्गिक अंधार जपण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून अवकाश विज्ञानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हा देखील आहे.
भविष्यातील इतर महत्त्वाची केंद्रे
लोणार आणि हरिहरेश्वर व्यतिरिक्त, राज्यातील इतर काही ठिकाणांचाही विकास खगोल पर्यटनासाठी केला जाणार आहे:
- पेंच व्याघ्र प्रकल्प
- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
- भंडारदरा
- तोरणमाळ
‘विकसित महाराष्ट्र 2047’ या व्हिजनचा हा एक भाग असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. विज्ञानाची आवड असलेले पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आता महाराष्ट्राचे आकाश हीच एक मोठी प्रयोगशाळा बनणार आहे.
हे देखील वाचा –
Vidhan Parishad Election Process: विधान परिषद निवडणूक कशी होते? वाचा









