Home / महाराष्ट्र / Baramati Election 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६: सुनेत्रा पवार यांची विक्रमी विजयाकडे वाटचाल; विजयाचा जल्लोष न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

Baramati Election 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६: सुनेत्रा पवार यांची विक्रमी विजयाकडे वाटचाल; विजयाचा जल्लोष न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

Baramati Election 2026 : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद आणि अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे...

By: Team Navakal
Baramati Election 2026 :
Social + WhatsApp CTA

Baramati Election 2026 : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद आणि अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. २३ एप्रिल रोजी पार पडलेल्या या ऐतिहासिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून अत्यंत कडक सुरक्षेत सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार, राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीगणिक अधिक मजबूत केली आहे. मतमोजणीच्या नवव्या फेरीअखेर त्यांनी ७८,५२८ मतांची प्रचंड आघाडी घेतली असून, त्यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरला आहे.

या विजयाचे स्पष्ट संकेत मिळताच सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत बारामतीकरांचे आभार मानले आणि आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया: “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित”
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांमधून मतदारांनी दाखवलेला हा प्रचंड विश्वास आपण आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत आहोत. आजचा निकाल समोर येत असताना दादांच्या आठवणींमुळे आपण सर्वजण अत्यंत भावूक झालो आहोत.

“अजितदादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कोणीही विजयी मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण सर्वांनी संयम राखणे गरजेचे असून दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

पुढे बोलताना त्यांनी बारामतीच्या जनतेचे ऋण व्यक्त केले. “अजितदादांच्या स्वप्नातील विकसित बारामती घडवण्याची मोठी संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, तर ही एक नवी सुरुवात आहे—निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीच्या निर्मितीची,” असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

अजितदादांचा तो ऐतिहासिक विक्रम सुनेत्रा पवार मोडणार का?
या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एकूण २२ उमेदवार रिंगणात होते, परंतु मतदारांनी इतर सर्व उमेदवारांना नाकारून सुनेत्रा पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विविध एक्झिट पोलनुसार सुनेत्रा पवार या दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा १,६५,२६५ मतांच्या विक्रमी फरकाने पराभव केला होता. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना हा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढण्यासाठी १,६५,२६६ मतांचा जादुई आकडा ओलांडणे आवश्यक आहे. नवव्या फेरीअखेर सुरू असलेली त्यांची घोडदौड पाहता, त्या हा विक्रम मोडणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या