Tamil Nadu Election 2026 : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अभिनेता थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कझगम’ (TVK) या पक्षाने राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज फेटाळून लावत एक नवा इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने १०० हून अधिक जागांवर लक्षणीय आघाडी घेतली असून, तमिळनाडूमध्ये सत्तेच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. दशकांपासून चालत आलेल्या द्रविड राजकारणाच्या समीकरणांना या निकालाने पूर्णपणे बदलून टाकले आहे. या अभूतपूर्व यशामागे महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर विजय यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेली ७ मोठी आश्वासने ‘गेमचेंजर’ ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
१. गृहिणींना आर्थिक बळ आणि बेरोजगारी भत्ता-
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या पावलावर पाऊल ठेवत थलपती विजय यांनी तमिळनाडूतील गृहिणींना दरमहा २५०० रुपये देण्याचे मोठे आश्वासन दिले. याशिवाय सुशिक्षित पदवीधरांना ४०० रुपये आणि डिप्लोमा धारकांना २५०० रुपये बेरोजगारी भत्ता जाहीर करून त्यांनी तरुणांना आकर्षित केले. तसेच, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी ५००० ते ८००० रुपयांचे विद्यावेतन आणि ५ लाख तरुणांसाठी १८,००० रुपयांची रोजगार सहाय्यता योजना राबवण्याचे वचन दिले.
२. मोफत सिलिंडरचे आश्वासन-
वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ६ एलपीजी (LPG) सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन विजय यांच्या पक्षाने दिले होते. ही घोषणा महिला मतदारांच्या मनाला थेट भिडली असून या आश्वासनाने मतदानात मोठे परिवर्तन घडवून आणले.
३. ‘अण्णन सीर थिट्टम’ योजना-
या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून थलपती विजय यांनी बहिणी आणि मुलींच्या विवाहासाठी ८ ग्रॅम सोने आणि पारंपरिक रेशमी साड्या भेट देण्याचे वचन दिले. या योजनेमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांमधील महिला मतदारांचा मोठा पाठिंबा ‘टीव्हीके’ पक्षाला मिळाला.
४. शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदत-
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी १५,००० रुपयांची शैक्षणिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. या आश्वासनामुळे पालकांनी विजय यांच्या पक्षाला भरघोस मतदान केले.
५. महिलांसाठी मोफत बस प्रवास-
महिलांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि स्वस्त व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाचे आश्वासन देण्यात आले होते. या घोषणेने नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर आकर्षित केले.
६. पेन्शन योजनेचा विस्तार-
ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींसाठी दरमहा ३००० रुपये पेन्शन देण्याची घोषणा विजय यांनी केली होती. याशिवाय, या योजनेचा लाभ आणखी १५ लाख नवीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे आश्वासन त्यांनी दिले होते, ज्यामुळे दुर्बल घटकांचा विश्वास संपादन करण्यास त्यांना यश आले.
७. मोफत वीज आणि मूलभूत सुविधा-
प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी २०० युनिट मोफत वीज आणि नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. यासोबतच, मजुरांच्या कल्याणासाठी अंगणवाडी सेविकांना १८,००० रुपये आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना १०,००० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या सर्वसमावेशक घोषणांमुळे थलपती विजय यांच्या पक्षाने पहिल्याच प्रयत्नात तमिळनाडूमध्ये मोठी राजकीय क्रांती घडवून आणली आहे.










