Sangram Bhandare : पुण्यातील राजगुरुनगर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक विधाने केली आहेत. “जेव्हा आपलाच हिंदू धर्माच्या प्रसारात अडथळा निर्माण करतो, तेव्हा नाईलाजास्तव आम्हाला एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकावी लागते,” असे वक्तव्य त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भंडारे यांनी हे विधान केल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
इतिहासाचा दाखला आणि फितुरीवर प्रहार
आपल्या भाषणात संग्राम बापू भंडारे यांनी इतिहासातील दाखले देत स्वधर्मीय फितुरांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “शिवाजी महाराजांच्या काळातही खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांसारख्या फितुरांना शिक्षा द्यावी लागली होती. फितूर हे धर्मासाठी शत्रूंपेक्षाही घातक असतात. धर्माच्या कार्यात जर स्वतःचा बाप किंवा भाऊबंद जरी आडवे आले, तरी त्यांना सोडायचे नसते, हीच शिकवण आपल्याला महाभारताने दिली आहे.” आपल्याला हिंदूंना लक्ष्य करण्यात कोणताही आनंद मिळत नाही, परंतु धर्माच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवणे हाच एकमेव पर्याय उरतो, असेही त्यांनी नमूद केले.
वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्वावर भाष्य
वारकरी संप्रदायाचे भगवेकरण केले जात असल्याच्या टीकेला उत्तर देताना भंडारे महाराज अधिक आक्रमक झाले. “वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचाच अविभाज्य भाग असून तो वेद मार्गाने चालणारा आहे. ७०० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी वारकऱ्यांच्या हाती जो झेंडा दिला, तो भगवाच होता. आजही आळंदी ते पंढरपूरच्या वाटेवर वारकरी जो ध्वज फडकवतात, तो आमचे हिंदुत्वच दर्शवतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. जे लोक वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचा संबंध नाकारतात, त्यांना जागेवरच चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘जय श्रीराम’ मंत्रावरून कडक इशारा
‘जय श्रीराम’ हा केवळ राजकीय मंत्र असल्याची टीका करणाऱ्यांचाही त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. “जय श्रीराम हा राजकीय मंत्र आहे असे म्हणणाऱ्यांच्या केवळ डोक्यावर शाई टाकू नका, तर त्यांच्या तोंडात शेण कोंबा,” अशा जहाल शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सध्या आपण ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटांविरुद्ध लढत असताना, स्वकीयांकडूनच मिळणारा विरोध क्लेशदायक असल्याचे त्यांनी सांगितले.












