Virat Kohli on WC 2027: एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली याला अजूनही स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागत आहे, यावर विश्वास बसणे कठीण आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतलेला ३७ वर्षांचा विराट सध्या फक्त वन-डे क्रिकेट खेळत आहे.
मात्र, आगामी २०२७ च्या विश्वचषकात तो आणि रोहित शर्मा खेळणार का, याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. या सर्व चर्चांवर आता स्वतः विराटने एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिले आहे.
Virat Kohli on WC 2027: “जिथे माझी किंमत नाही, तिथे मी थांबणार नाही”
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोहलीने त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विराट म्हणाला, “माझा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. जर मी संघासाठी काही योगदान देऊ शकत असेल आणि तिथल्या लोकांनाही माझी गरज वाटत असेल, तर मी नक्कीच मैदानात दिसेन. पण जर मला असे भासू केले गेले की मला माझी योग्यता आणि किंमत सिद्ध करावी लागेल, तर मी त्या ठिकाणी राहू इच्छित नाही.”
Virat Kohli on WC 2027: ४० ओव्हर्स धावायला सांगा, मी धावेन!
आपल्या तयारीबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “मी माझ्या खेळाशी आणि सरावाशी प्रामाणिक आहे. मी खूप कष्ट करतो. देवाने मला क्रिकेट कारकिर्दीत जे काही दिले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्ही मला वन-डे सामन्यात ४० ओव्हर सीमारेषेवरून धावायला सांगितले, तर मी कोणतीही तक्रार न करता ते करेन. मी मैदानावर प्रत्येक चेंडू असा खेळतो जणू तो माझ्या कारकिर्दीतील शेवटचा चेंडू आहे. इतके सर्व केल्यानंतरही जर मला स्वतःला सिद्ध करावे लागत असेल, तर ती जागा माझ्यासाठी नाही.”
Virat Kohli on WC 2027: विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन
बीसीसीआयच्या आदेशानंतर विराटने दोन दशकांनंतर दिल्लीसाठी विजय हजारे ट्रॉफी या देशांतर्गत स्पर्धेत भाग घेतला होता. तिथे त्याने दोन सामन्यांत १ शतक आणि १ अर्धशतकासह २०८ धावा कुटल्या. या अनुभवाबद्दल सांगताना तो म्हणाला, “बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सामना पाहयला एकही माणूस नव्हता. सुरुवातीला वाटले की मी इतकी वर्षे खेळलोय, तर इथे मला प्रेरणा मिळेल का? पण बॅट हातात घेतल्यावर मी पुन्हा एका लहान मुलासारखा झालो. मी कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर फक्त खेळावरील प्रेमापोटी खेळत होतो.”
Virat Kohli on WC 2027: सतत बदलणाऱ्या भूमिकेवर नाराजी
विराटने याची तुलना एका सामान्य नोकरीशी केली. “एका आठवड्यात तुमच्या कामाचे कौतुक करायचे आणि दुसऱ्या आठवड्यात तुमच्या क्षमतेवर शंका घ्यायची, हे मला पटत नाही. जर मी योग्य नसेन तर पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा. निकालावरून आपली भूमिका बदलणाऱ्यांपैकी मी नाही. माझी लाइफस्टाईलच क्रिकेटसाठी आहे, मी कोणत्याही मालिकेच्या केवळ दोन आठवडे आधी सराव करत नाही, तर वर्षभर तयार असतो.”
२०२७ च्या विश्वचषकाचे काय?
सध्या २०२६ चे वर्ष सुरू असतानाच मला वारंवार २०२७ च्या विश्वचषकाबद्दल विचारले जाते, असे सांगत विराटने स्पष्ट केले की, भारतासाठी विश्वचषक खेळणे हा नेहमीच अभिमानाचा क्षण असतो. पण हा आदर आणि गरज दोन्ही बाजूंनी असायला हवी.
आकडेवारीचा विचार केला तर विराटने ३११ एकदिवसीय सामन्यांच्या २९९ डावांमध्ये ५८.७१ च्या सरासरीने १४,७९७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ५४ शतके आणि ७७ अर्धशतकांचा समावेश आहे.
हे देखील वाचा – PM Modi on Foreign Travel Tax: परदेश प्रवासावर नवीन कर लागणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ चर्चेवर स्वतः पंतप्रधान मोदींनी दिले स्पष्टीकरण










