Home / लेख / World Best Ice Creams: जगातील टॉप 100 आईस्क्रीममध्ये भारताचे 5 फ्लेवर्स सामील; मुंबई-बेंगळुरूमधील ‘या’ ब्रँड्सचा डंका

World Best Ice Creams: जगातील टॉप 100 आईस्क्रीममध्ये भारताचे 5 फ्लेवर्स सामील; मुंबई-बेंगळुरूमधील ‘या’ ब्रँड्सचा डंका

World Best Ice Creams: उन्हाळा सुरू झाला की आबालवृद्धांना वेध लागतात ते थंडगार आईस्क्रीमचे. वाढत्या पाऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि जिभेचे...

By: Team Navakal
World Best Ice Creams
Social + WhatsApp CTA

World Best Ice Creams: उन्हाळा सुरू झाला की आबालवृद्धांना वेध लागतात ते थंडगार आईस्क्रीमचे. वाढत्या पाऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आईस्क्रीमचा आस्वाद घेतात.

अशातच, जगभरातील खाद्यपदार्थांची माहिती देणारी प्रसिद्ध वेबसाईट ‘टेस्टअ‍ॅटलस’ (TasteAtlas) ने जगातील 100 सर्वोत्तम आईस्क्रीमची (100 Best Ice Creams in the World) एक यादी जाहीर केली आहे. भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, या जागतिक यादीत भारतातील 5 प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड्सच्या फ्लेवर्सचा समावेश करण्यात आला आहे.

या यादीत स्थान मिळवणारे भारतातील ‘ते’ 5 सर्वोत्तम आईस्क्रीम फ्लेवर्स कोणते आहेत, ते जाणून घेऊया:

1. मँगो आईस्क्रीम सँडविच – के. रुस्तम अँड कंपनी (मुंबई)

मुंबईतील चर्चगेट भागात 1953 मध्ये सुरू झालेले ‘के. रुस्तम अँड कंपनी’ हे दुकान त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आईस्क्रीम सँडविचसाठी ओळखले जाते. दोन पातळ वेफर्सच्या मध्ये आईस्क्रीमचा मोठा तुकडा (स्लॅब) ठेवून हे सँडविच दिले जाते. यामधील ‘मँगो आईस्क्रीम सँडविच’ हे ग्राहकांचे सर्वात लाडके असून, त्याच्या क्रीमी टेक्स्चर आणि नैसर्गिक गोडव्यासाठी ते जगभर प्रसिद्ध झाले आहे.

2. गदबद आईस्क्रीम – पब्बास (मंगळुरू)

कर्नाटकातील मंगळुरू येथील ‘पब्बास’ हे आईस्क्रीम पार्लर 1975 पासून खवय्यांच्या सेवेत आहे. येथील ‘गदबद आईस्क्रीम’ (Gadbad Ice Cream) ही एक अत्यंत लोकप्रिय आणि शाही डिश आहे. यामध्ये एकाच वेळी अनेक फ्लेवर्सचे आईस्क्रीम, ताजी फळे, क्रंची ड्रायफ्रूट्स, जेली आणि गोड सिरप एकत्र करून दिले जाते. मंगळुरूला जाणाऱ्या प्रत्येकाने हे आईस्क्रीम ट्राय केलेच पाहिजे, अशी याची ख्याती आहे.

3. टेंडर कोकोनट – नॅचरल्स आईस्क्रीम (मुंबई)

ताजी फळे आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून कोणतीही कृत्रिम चव किंवा प्रिजर्व्हेटिव्ह्ज न वापरता आईस्क्रीम तयार करण्यासाठी ‘नॅचरल्स’ हा ब्रँड ओळखला जातो. 1984 मध्ये मुंबईत सुरू झालेल्या या ब्रँडचा ‘टेंडर कोकोनट’ (शहाळ्याचे खोबरे) हा फ्लेवर जगात भारी ठरला आहे. दुधाच्या क्रीमी बेसमध्ये शहाळ्याच्या खोबऱ्याचे तुकडे असलेला हा फ्लेवर स्थानिक लोकांसोबतच पर्यटकांच्याही गळ्यातील ताईत बनला आहे.

4. पेरू आईस्क्रीम – अप्सरा आईस्क्रीम्स (मुंबई)

मुंबईत 1971 मध्ये सुरू झालेल्या ‘अप्सरा आईस्क्रीम्स’ने नेहमीच आपल्या गुणवत्तेत सातत्य राखले आहे. या ब्रँडचे ‘गुआवा’ म्हणजेच पेरू आयस्क्रीम कमालीचे लोकप्रिय आहे. या आईस्क्रीमची चव गोड-आंबट असून, त्यावर पेरूचे तुकडे आणि वरून हलकासा मसाला भुरभुरून दिला जातो. भारतात ज्या पारंपरिक पद्धतीने पेरूवर तिखट-मीठ लावून खाल्ला जातो, अगदी तशीच अस्सल चव या आईस्क्रीममध्ये मिळते.

5. डेथ बाय चॉकलेट – कॉर्नर हाऊस (बेंगळुरू)

चॉकलेट प्रेमींसाठी बेंगळुरूमधील ‘कॉर्नर हाऊस’ हे ठिकाण म्हणजे जणू स्वर्गच आहे. 1982 मध्ये सुरू झालेल्या या पार्लरमधील ‘डेथ बाय चॉकलेट’ (Death by Chocolate) हे संडे आईस्क्रीम प्रचंड लोकप्रिय आहे. चॉकलेट केकचे लेअर्स, त्यावर घट्ट डार्क चॉकलेट सॉस, भरपूर ड्रायफ्रूट्स आणि वरून चेरी लावून सजवलेली ही डिश चॉकलेटवेड्यांना वेड लावते.

जागतिक पातळीवरील इतर आवडते फ्लेवर्स

भारताच्या या ५ फ्लेवर्ससोबतच जगातील इतरही काही प्रसिद्ध आईस्क्रीम्सना या यादीत स्थान मिळाले आहे. यामध्ये इंडोनेशियाचे स्पॅगेटी आईस्क्रीम, इराणचे अकबर माश्ती, आयर्लंडचे डिंगल सी सॉल्ट, जपानचे माचा जिलाटो आणि न्यूझीलंडचे होकी पोकी यांसारख्या अनोख्या फ्लेवर्सचा समावेश आहे.

हे देखील वाचा – CJI Surya Kant: “काही तरुण झुरळांसारखे…”; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अखेर मोठे स्पष्टीकरण!

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या