Home / महाराष्ट्र / Monsoon Rain : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून सर्वात मोठी अपडेट; पुढच्या तीन-चार दिवसांत मान्सूनची जोरदार एन्ट्री..

Monsoon Rain : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून सर्वात मोठी अपडेट; पुढच्या तीन-चार दिवसांत मान्सूनची जोरदार एन्ट्री..

Monsoon Rain : प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे होरपळून निघालेल्या नागरिकांसाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) एक अत्यंत दिलासादायक वार्ता दिली...

By: Team Navakal
Monsoon Rain
Social + WhatsApp CTA

Monsoon Rain : प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे होरपळून निघालेल्या नागरिकांसाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) एक अत्यंत दिलासादायक वार्ता दिली आहे. आज २३ मे रोजी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही महत्त्वाच्या भागांत आपली पावले यशस्वीपणे पुढे टाकली आहेत. मान्सूनच्या या सक्रियतेमुळे यंदा पावसाळा समाधानकारक आणि वेळेवर होण्याचे संकेत मिळत आहेत.

पुढील ४ दिवस मान्सूनच्या वाटचालीस पोषक
हवामान खात्याच्या ताज्या विश्लेषणानुसार, येत्या ३ ते ४ दिवसांत मान्सूनचा प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी वातावरणात अत्यंत अनुकूल आणि पोषक स्थिती निर्माण झाली आहे. या कालावधीत अरबी समुद्राचा उर्वरित भाग, कोमोरिन क्षेत्र आणि अंदमान समुद्राचा मोठा हिस्सा मान्सूनच्या कवेत येण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला गती मिळत असून, यंदाच्या प्रवासात अद्याप कोणत्याही चक्रीवादळाचा अडथळा निर्माण झालेला नाही, ही अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बाब मानली जात आहे.

केरळ आणि महाराष्ट्रात मान्सूनचे संभाव्य आगमन
यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन हे नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामान्यतः १ जून रोजी धडकणारा पाऊस यंदा २६ मे रोजीच केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. जर हा वेग असाच कायम राहिला, तर ५ जूनला गोव्यात मान्सूनचे आगमन होईल. महाराष्ट्राचा विचार करता, ६ जूनला कोकण आणि ७ जूनला पुण्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत असलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळाला आहे.

विदर्भात उष्णतेचा हाहाकार: ब्रह्मपुरी देशात सर्वाधिक उष्ण
एककीडे मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असताना, दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेने रौद्र रूप धारण केले आहे. शनिवारी २२ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे चक्क ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे हे शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले असून उष्णतेची ही लाट पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी
विदर्भातील गंभीर परिस्थिती पाहता हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतही उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने तिथे ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या