Ebola Alert at Pune Airport: आंतरराष्ट्रीय पातळीवर इबोला विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून हा घातक संसर्ग शहरात पसरू नये, यासाठी विमानतळावर प्रवाशांची विशेष आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
पुणे विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पुणे विमानतळावर इबोलाचा एकही संशयित किंवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ प्राधिकरण, पुणे विमानतळ आरोग्य संघटना आणि जलद प्रतिसाद यंत्रणेच्या (क्विक रिस्पॉन्स टीम) संयुक्त विद्यमाने विमानतळ परिसरात चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
Ebola Alert : प्रवाशांसाठी हे नियम असणार बंधनकारक
विशेषतः दुबई आणि बँकॉक या शहरांमधून पुणे विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर आरोग्य विभाग बारीक लक्ष ठेवून असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खालील पावले उचलली जात आहेत:
- थर्मल स्क्रीनिंग: परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तापमान (ताप) तपासणी केली जाईल.
- स्वयंघोषणा अर्ज: सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानतळावर पोहोचल्यावर एक स्वयंघोषणा अर्ज (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) भरणे सक्तीचे असेल.
- विलगीकरण: तपासणी दरम्यान लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवाशांना तातडीने मार्गदर्शक सूचनांनुसार विलगीकरणात (क्वारंटाईन) ठेवले जाईल.
- जनजागृती मोहीम: प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी इबोलाची लक्षणे आणि बचावाच्या उपायांची माहिती देणारे फलक संपूर्ण विमानतळ परिसरात लावण्यात आले आहेत.
Ebola Alert : प्रवाशांना अचूक माहिती देण्याचे आवाहन
विमानतळ प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वयंघोषणा अर्जात आपली खरी आणि अचूक माहिती भरावी. विशेषतः खालील लक्षणे असल्यास किंवा अलीकडच्या प्रवासाचा इतिहास असल्यास तो लपवू नये:
- तीव्र ताप आणि शरीरात अत्यंत अशक्तपणा जाणवणे.
- उलट्या होणे किंवा शरीराच्या कोणत्याही भागातून अंतर्गत/बाह्य रक्तस्त्राव होणे.
- अलीकडच्या काळात आफ्रिकन देशांमध्ये केलेला प्रवास किंवा तिथल्या लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती.
Ebola Alert : इबोलाचा नेमका धोका काय?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाच्या वाढत्या प्रसाराला ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले आहे. सध्या पश्चिम आफ्रिकेतील काँगो आणि युगांडा या देशांमध्ये इबोला विषाणूच्या ‘बुंदिबुग्यो स्ट्रेन’मुळे व्हायरल हॅमोरेजिक फीव्हर म्हणजेच तीव्र रक्तस्रावी तापाची मोठी साथ पसरली आहे.
या आजाराचा मृत्यूदर प्रचंड जास्त आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, सध्या जगात कोणत्याही देशाकडे इबोलाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणतीही लस किंवा उपचारासाठी ठोस औषध उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेला केवळ सार्वजनिक आरोग्याच्या नियमांवर आणि प्रतिबंधात्मक उपायांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
दुसरा सर्वात मोठा उद्रेक
काँगो आणि युगांडाच्या सीमाभागात या विषाणूने थैमान घातले आहे. एकट्या काँगोच्या 3 प्रांतांमध्ये आतापर्यंत 867 संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०१४ ते २०१६ या काळात पश्चिम आफ्रिकेत आलेल्या भीषण साथीनंतरचा हा इतिहासातील दुसरा सर्वात मोठा उद्रेक मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर काँगो आणि युगांडाला लागून असलेल्या दक्षिण सुदानसह इतर शेजारील देशांमध्ये हा संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका सर्वाधिक आहे. याच कारणास्तव भारतासह जगभरातील प्रमुख विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.










