Deool Band 2 : प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि लेखन लाभलेल्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने सध्या मराठी चित्रपटसृष्टीत यशाचे नवे परिमाण प्रस्थापित केले आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचून आणले असून, मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक खेळ ‘हाऊसफुल’ होताना दिसत आहेत. श्रद्धा आणि विज्ञानाच्या संघर्षाला सामाजिक प्रश्नांची जोड देणाऱ्या या चित्रपटाने केवळ पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे.
बॉक्स ऑफिसवर कमाईचा झंझावात
गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्टीचा मोठा लाभ मिळाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी (ओपनिंग डे) २.४५ कोटी रुपयांची आश्वासक कमाई केली. त्यानंतर शनिवारी ४.८५ कोटी आणि रविवारी तब्बल ५.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवून चित्रपट व्यापार विश्लेषकांना थक्क केले. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपटाने एकूण २२.६७ कोटी रुपयांचे ‘ग्रॉस कलेक्शन’ केले असून, भारतातील ‘नेट कलेक्शन’ १९.२४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मराठी चित्रपटासाठी ही आकडेवारी अत्यंत सकारात्मक मानली जात आहे.
तगडी स्टारकास्ट आणि दर्जेदार अभिनय
सुमारे दहा वर्षांपूर्वी आलेल्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामींची भूमिका पुन्हा एकदा समर्थपणे साकारली आहे. तसेच प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, प्रसाद ओक, गश्मीर महाजनी, महेश मांजरेकर, ओम भूतकर आणि संस्कृती बालगुडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त अतुल कुदळे, रमेश परदेशी, सविता मालपेकर, देवेंद्र गायकवाड आणि सुनील अभ्यंकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे.
ग्रामीण वास्तव आणि देव-भक्ताचा अनोखा संवाद
‘देऊळ बंद २’ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांवर थेट भाष्य करतो. चित्रपटात स्नेहल तरडे यांनी एका संघर्षशील शेतकरी महिलेची भूमिका साकारली आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा या चक्रात अडकलेली ही महिला व्यवस्थेला जाब विचारताना दिसते. “मी तुमचं अस्तित्व मान्य करेन, पण तुम्ही आधी परीक्षा द्या,” असे म्हणत स्वामींनाच प्रश्न विचारणारी ही हतबल महिला प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेते. तिथूनच देवाच्या परीक्षेचा आणि दर्यापूरच्या प्रवासाचा एक थरारक अनुभव सुरू होतो, जो एसटी बसमधील गर्दीतून माणसांच्या संवेदनांपर्यंत पोहोचतो.
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
पहिल्या भागातील अनेक कलाकार याही भागात महत्त्वाच्या भूमिकेत असल्याने प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. नवीन कथानक आणि ग्रामीण भागातील वास्तववादी मांडणीमुळे तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच स्तरांतून चित्रपटाला दाद मिळत आहे.











