CBSE Class 12 Re Evaluation: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता 12 वीच्या निकालावरून सुरू असलेल्या अभूतपूर्व वादानंतर आजपासून पुनर्मूल्यांकन म्हणजेच ‘री-इव्हॅल्युएशन’ प्रक्रियेला सुरुवात होत आहे. बोर्डाने यंदा लागू केलेल्या नवीन ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) पद्धतीमुळे निकालात मोठा गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सुरू होणारी अर्ज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या चुका आणि तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका मुलाखतीत संकेत दिले आहेत की, परिस्थिती पाहता सुमारे 20 टक्के विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाचा पर्याय निवडू शकतात.
CBSE Class 12 Re Evaluation: आतापर्यंत ११ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकेसाठी अर्ज
यंदा निकालाच्या पारदर्शकतेवर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर संशय व्यक्त केला आहे. बोर्डाने जारी केलेली अधिकृत आकडेवारी या चिंतेची भीषणता दर्शवते:
- अर्जदार विद्यार्थी: 4,04,319 विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकेची डिजिटल प्रत मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
- एकूण मागण्या: वेगवेगळ्या विषयांच्या एकूण 11,31,961 उत्तरपत्रिकांची मागणी करण्यात आली आहे.
- डिजिटल वितरण: यापैकी 8,98,214 उत्तरपत्रिका बोर्डाकडून आधीच डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
CBSE Class 12 Re Evaluation: ऑन-स्क्रीन मार्किंग पद्धतीवर का उठले वादळ?
सीबीएसईने यंदा १२ वीच्या परीक्षांसाठी उत्तरपत्रिका प्रत्यक्ष तपासण्याऐवजी त्या स्कॅन करून संगणकावर तपासण्याची डिजिटल (OSM) पद्धत आणली होती. निकाल जलद आणि अचूक लागावा हा यामागचा उद्देश होता.
परंतु, निकाल जाहीर होताच सोशल मीडियावर तक्रारींचा पूर आला. अनेक हुशार विद्यार्थ्यांना अत्यंत कमी गुण मिळणे, काही उत्तरे न तपासली जाणे, स्कॅनिंग अस्पष्ट असणे आणि बोर्डाचे पोर्टल वारंवार क्रॅश होणे अशा गंभीर समस्या समोर आल्या. काही पालकांनी तर सोशल मीडियावर अर्धवट तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे स्क्रीनशॉट शेअर करून बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
CBSE Class 12 Re Evaluation: तीव्र विरोधानंतर बोर्डाकडून शुल्कात मोठी कपात
सुरुवातीला पुनर्मूल्यांकन आणि गुण पडताळणीसाठी असणारे शुल्क खूप जास्त असल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत होता. यावर देशभरातून टीका झाल्यानंतर बोर्डाने माघार घेत फीचे दर मोठ्या प्रमाणावर कमी केले आहेत:
| सेवेचा प्रकार | जुने शुल्क (रुपये) | नवीन सुधारित शुल्क (रुपये) |
| उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळवणे | 700 प्रति विषय | 100 प्रति विषय |
| गुण पडताळणी (Verification) | 500 प्रति विषय | 100 प्रति विषय |
| पुनर्मूल्यांकन (Re-evaluation) | 100 प्रति प्रश्न | प्रति प्रश्न दरात सवलत |
विशेष म्हणजे, पुनर्मूल्यांकनानंतर जर विद्यार्थ्याचे गुण वाढले, तर भरलेले शुल्क परत (रिफंड) केले जाईल, असेही बोर्डाने जाहीर केले आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा? पाहा स्टेप्स
इच्छुक विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खालील ४ टप्प्यांत आपला अर्ज पूर्ण करू शकतात:
- टप्पा १ (स्कॅन कॉपी मिळवणे): सर्वात आधी विद्यार्थ्यांना त्यांच्या तपासलेल्या उत्तरपुस्तिकेची डिजिटल प्रत डाऊनलोड करावी लागेल.
- टप्पा २ (उत्तरपत्रिकेचे निरीक्षण): मिळालेली प्रत काळजीपूर्वक तपासावी. सर्व प्रश्नांना गुण दिले आहेत का, बेरजेत काही चूक आहे का किंवा एखादे पान तपासयचे राहिले आहे का, याची खात्री करावी.
- टप्पा ३ (गुण पडताळणी): काही त्रुटी आढळल्यास सुरुवातीला गुण पडताळणीसाठी अर्ज करावा लागतो.
- टप्पा ४ (पुनर्मूल्यांकन): पडताळणीनंतरही जर एखाद्या विशिष्ट प्रश्नाच्या गुणांवर आक्षेप असेल, तर थेट पुनर्मूल्यांकनाचा पर्याय निवडावा.
बोर्डाने स्पष्ट केले आहे की, या प्रक्रियेनंतर गुण वाढू शकतात, कमी होऊ शकतात किंवा तसेच राहू शकतात. यानंतर येणारा निकाल अंतिम मानला जाईल.
राजकीय रंग आणि सायबर सुरक्षेचा प्रश्न
हा वाद केवळ गुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही. एका किशोरवयीन हॅकरने सीबीएसईच्या पोर्टलमध्ये त्रुटी असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, मुख्य मूल्यमापन यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असून तो केवळ एक डमी प्लॅटफॉर्म होता, असे स्पष्टीकरण बोर्डाने दिले.
दुसरीकडे, विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला घेरले असून डिजिटल मूल्यमापन प्रक्रियेच्या कंत्राटावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व गदारोळात आज सुरू होणाऱ्या पुनर्मूल्यांकनाकडे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत.
हे देखील वाचा – NEET UG Re Exam 2026: नीट पेपर लीक रोखण्यासाठी आता थेट वायुसेनेची मदत! 21 जूनच्या परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन









