Pandharpur Accident : सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी दुर्घटना समोर आली आहे. देवदर्शन आटोपून आनंदाने आपल्या घराकडे निघलेल्या भाविकांवर वाटेतच काळाने घाला घातला. म्हसवड-पंढरपूर मार्गावरून प्रवास करणाऱ्या भाविकांची पिकअप गाडी माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ थेट रस्त्याशेजारी असलेल्या एका खाजगी शेतातील खोल विहिरीत कोसळली.
या भीषण अपघातात गाडीतील 8 प्रवाशांचा पाण्यात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. या अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात आणि रांजणी गावावर शोककळा पसरली आहे.
नेमका कसा झाला हा भीषण अपघात?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रांजणी गावचे काही नागरिक लहान मुलांसह पिकअप गाडीने म्हसवड येथील प्रसिद्ध सिद्धनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी गेले होते.
- वाहनावरील नियंत्रण सुटले: दर्शन घेऊन गावाकडे परतत असताना, तांदूळवाडी परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले.
- विहिरीत कोसळली गाडी: अनियंत्रित झालेली ही पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत जाऊन पडली.
- 14 प्रवासी होते स्वार: या वाहनात लहान मुलांसह एकूण 14 जण प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सुदैवाने, या दुर्घटनेतून 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त; आर्थिक मदत जाहीर
या भीषण दुर्घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत, या अपघातात जीव गमावलेल्या भाविकांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
तसेच, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतल्या प्रशासनाकडून माहिती
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृत भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत मन हेलावून टाकणारी आहे. मी स्वतः सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून या अपघाताची सखोल माहिती घेतली आहे. तसेच प्रशासनाला पीडित कुटुंबांना आणि जखमींना तातडीने सर्व आवश्यक ती मदत आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
हे देखील वाचा – NEET UG Re-Exam: नीट री-एक्झामचे अॅडमिट कार्ड जाहीर; 21 जूनला होणार परीक्षा, डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स










