Home / News / Operation Tiger : Four UBT MPs Reach Delhi- Eknath Shinde Also Leaves उबाठाचे 4 खासदार दिल्लीत! एकनाथ शिंदेही रवाना ! वर्धापन दिनाआधीच ‘ऑपरेशन टायगर’ होणार

Operation Tiger : Four UBT MPs Reach Delhi- Eknath Shinde Also Leaves उबाठाचे 4 खासदार दिल्लीत! एकनाथ शिंदेही रवाना ! वर्धापन दिनाआधीच ‘ऑपरेशन टायगर’ होणार

Operation Tiger : Four UBT MPs Reach Delhi – Eknath Shinde Also Leaves – राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या...

By: Team Navakal
Operation Tiger : Four UBT MPs Reach Delhi - Eknath Shinde Also Leaves
Social + WhatsApp CTA


Operation Tiger : Four UBT MPs Reach Delhi – Eknath Shinde Also Leaves – राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असताना उबाठातील चार खासदार तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. उबाठा गटाचे यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे संजय जाधव हे विशेष खासगी विमानाने दिल्लीला गेले आहेत. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला पोहोचले. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. तर हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर आणि धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर नॉट रिचेबल झाले आहेत.

या खासदारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधीच ऑपरेशन टायगर पार पडणार, असे म्हटले जात आहे. कदाचित उद्याच स्वतंत्र गटाचे पत्र दिले जाण्याची शक्यता आहे.
उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण पाच खासदार अनुपस्थित होते. ते ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.

या खासदारांनी अनुपस्थित राहण्याची वेगवेगळी कारणे दिली होती. आज संजय देशमुख आणि संजय जाधव हे संध्याकाळी नांदेड विमानतळावरून विशेष विमानाने एकत्र दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर त्यांचे मोबाईल बंद झाले. त्यांचे स्वीय सहायक आणि सुरक्षा रक्षकांचे फोनही बंद झाले. खा. जाधव यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नागेश आष्टीकर यांची स्वाक्षरी घेतल्याचे सांगितले जात आहे. राजाभाऊ वाजे यांनी आपण आज संसदीय समितीच्या बैठकीला दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला गेले. मात्र, 19 जूनला उबाठाच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहाणार का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, दिल्लीतून परतल्यावर माझ्या मतदारसंघात जाणार आहे. तिथे माझे काही कार्यक्रम आहेत. भाऊसाहेब वाकचौरे आधी अज्ञात स्थळी गेल्याचे सांगितले जात होते. नंतर ते दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले.


उबाठाच्या एकूण 10 खासदारांपैकी 7 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. ते उद्याच आपला नवा गट स्थापन करून, तसे पत्र लोकसभाध्यक्षांना देणार आहेत, अशी माहिती आहे. येत्या 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा स्थापनादिन आहे. या दिवसाच्या अगोदरच हे सर्व खासदार आपला वेगळा गट स्थापन करणार आहेत, असे बोलले जात आहे. मराठवाड्यातील उबाठाचे एक खासदार नंतर फुटीर खासदारांत सहभागी होतील, अशीही माहिती आहे. ही संभाव्य फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. चर्चांना वेग आल्यानंतर उबाठाचे खासदार अनिल देसाई आणि संजय राऊत हे दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र, गटनेते अरविंद सावंत अद्याप दिल्लीला पोहोचलेले नाहीत.

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि अनिल देसाई यांना खासदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. याबाबत बोलताना उबाठाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात देशातील सर्व 543 खासदार असू शकतात. मात्र ऑपरेशन टायगरबाबतच्या चर्चा मागील वर्षापासून काही महिन्यांच्या अंतराने सुरूच आहेत. दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत संजय देशमुख यांची भेट घेणारे शिंदेसेनेचे केंद्रिय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी सांगितले की, उबाठा खासदारांवर वारंवार अविश्वास दाखवला जातो. पक्षाशी प्रामाणिक असून, शंका घेतल्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे. त्या असंतोषाचा स्फोट होऊन ऑपरेशन टायगर होईल.
दरम्यान, शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गट यांनी 19 जून रोजी होणार्‍या शिवसेनेच्या वर्धापन दिनाची तयारी सुरू केली आहे. उबाठाचा वर्धापनदिन षण्मुखानंद हॉलमध्ये तर शिंदे गटाचा वर्धापनदिन सोहळा गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. मात्र उबाठाच्या वर्धापनदिनावर ‘ऑपरेशन टायगर’चे सावट असणार आहे.

तर उबाठा विधानपरिषद आमदार अंबादास दानवे म्हणाले की,मला असे वाटते की अनेक गोष्टी कपोलकल्पित सांगितल्या जात आहेत. आम्ही माहिती घेतली त्यानुसार काहीजण दिल्लीला असू शकतात. परंतु काहीजण राज्यातच त्यांच्या मतदारसंघात आहेत.खा. नागेश आष्टीकर यांचा मुलगा विधानपरिषदेचा उमेदार आहे ते इथेच आहे, खा. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा रुग्णालयात आहे तेही त्यांच्या मतदारसंघात आहे. काही खासदार नॉट रिचेबल असण्याबाबत ते म्हणाले की, माझा फोन बंद आला म्हणजे मी कुठे जाणार असा अर्थ होत नाही. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मी काही लोकांशी संपर्क साधला , आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.तर खा. संजय राऊत यांनी एक्स पोस्ट केली की,अपना सपना मनी..मनी!महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!

Web Title:
संबंधित बातम्या