Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील नवनिर्वाचित भाजपा सरकारकडून सध्या राज्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणांवर ‘बुलडोझर’ कारवाई सुरू आहे. या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ‘फेरीवाले हटाव’ मोहिमेविरोधात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मोहिमेला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः कोलकात्याच्या रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ अचानक जाहीर आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे राज्याच्या राजधानीत प्रचंड राजकीय राजकीय वातावरण तापले असून हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
या निषेध आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि शेकडो फेरीवाल्यांसोबत एकत्र येत एक भव्य मानवी साखळी (Human Chain) तयार केली. यानंतर त्यांनी मध्य कोलकात्यातील धर्मतळा (Dharmatala) ते एस्प्लेनेड (Esplanade) आणि तिथून पुढे सुबोध मल्लिक स्क्वेअरपर्यंत (वेलिंग्टन स्क्वेअर) सुमारे १.२ किलोमीटर अंतराचा पायी मोर्चा काढला. ‘पुनर्वसनाशिवाय फेरीवाल्यांचे निष्कासन खपवून घेतले जाणार नाही,’ अशी ठाम भूमिका घेत ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारच्या या कारवाईला ‘बेकायदेशीर, अन्यायकारक आणि अमानुष’ असे संबोधले.
गरीब फेरीवाल्यांच्या रोजगारावर गदा आणणारे भाजप सरकार सत्तेच्या हव्यासापोटी लवकरच कोसळेल; पायी मोर्च्यादरम्यान ममता बॅनर्जींचा घणाघात-
पश्चिम बंगालमधील भाजप सरकारच्या वतीने संपूर्ण राज्यात सध्या राबवल्या जाणाऱ्या ‘फेरीवाले हटाव’ मोहिमेविरोधात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपला संघर्ष अधिक तीव्र केला आहे. कोलकात्याच्या रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करत असताना, ममता बॅनर्जी यांनी प्रशासनाकडे एकच प्रमुख मागणी लावून धरली आहे. कोणत्याही गरीब फेरीवाल्याला हटवण्यापूर्वी त्यांचे कायदेशीररीत्या पुनर्वसन करण्यात यावे, तसेच त्यांच्या हक्कांचे आणि हक्काच्या रोजगाराचे पूर्ण संरक्षण केले जावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या आंदोलनाची पार्श्वभूमी अत्यंत गंभीर आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने कोलकात्यासह उपनगरांतील जादवपूर आणि दमदम रेल्वे स्थानक परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि गरीब फेरीवाल्यांचे तात्पुरते स्टॉल्स (टपऱ्या) हटवण्याची एक मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. कोणतीही पूर्वकल्पना किंवा पर्यायी व्यवस्था न करता गरीब मध्यमवर्गीयांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेण्याच्या या शासकीय कारवाईला तीव्र विरोध करण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः रस्त्यावर उतरल्या. या पायी मोर्च्यादरम्यान त्यांनी स्वतः हातात निषेधाचे फलक (प्लॅकार्ड्स) धरून सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत फेरीवाल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही दिली.
या व्यापक आंदोलनासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स हँडलवरून सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तृणमूलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हे जनआंदोलन प्रामुख्याने संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये गरिबांच्या पोटावर पाय देऊन फेरीवाल्यांना अत्यंत बेकायदेशीरपणे आणि अमानुषपणे हटवले जाण्याच्या विरोधात पुकारण्यात आले आहे.” भाजपवर अत्यंत बोचरी आणि राजकीय प्रहार करताना तृणमूलने पुढे लिहिले की, “ज्या पक्षाचे धोरण केवळ गरिबांचा छळ करणे हेच आहे आणि जो पक्ष केवळ सत्तेच्या हव्यासाने प्रेरित होऊन वागत आहे, असे जनविरोधी सरकार अल्पायुषी ठरेल आणि ते लवकरच कोसळेल.










