Home / News / Rebel MPs Exposed: Unspent Funds Reveal Reality Behind Defection – फुटीर खासदारांची पूर्ण पोलखोल!मिळालेला निधी खर्चच केलेला नाही

Rebel MPs Exposed: Unspent Funds Reveal Reality Behind Defection – फुटीर खासदारांची पूर्ण पोलखोल!मिळालेला निधी खर्चच केलेला नाही

Rebel MPs Exposed – Unspent Funds Reveal Reality Behind Defection – शिवसेना उबाठात असताना विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता. त्यामुळे पक्षांतर...

By: Team Navakal
Rebel MPs Exposed - Unspent Funds Reveal Reality Behind Defection
Social + WhatsApp CTA


Rebel MPs Exposed – Unspent Funds Reveal Reality Behind Defection –
शिवसेना उबाठात असताना विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता. त्यामुळे पक्षांतर करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे कारण सातत्याने पुढे करत उबाठाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करून शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, निधी वापराबाबत उघड झालेल्या माहितीवरून या खासदारांचा बुरखा टराटरा फाटला आहे. या सहा खासदारांना मागील दोन वर्षांत मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीचा त्यांनी जेमतेमही वापर केला नाही आणि विकासाची कामेही केली नाहीत. त्यामुळे निधी पडून आहे. या पोलखोलमुळे आता त्यांना तोंड लपवायला जागा नाही.


आपण निधी मिळत नसल्याने उबाठा सोडली, हा त्यांचा दावा म्हणजे बंडखोरीसाठी केलेला निव्वळ कांगावा असल्याचे सिद्ध झाले आहे. खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक गरजांनुसार रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, आरोग्य सुविधा आदि विकासकामे करण्यासाठी केंद्र सरकारकडून खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यवधीचा निधी दिला जातो. उबाठातून शिवसेनेत गेलेल्या खासदारांनी उबाठातून बाहेर पडण्याचे मुख्य कारण निधीअभावी कामे रखडल्याचे सांगितले होते.

धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तर सांगितले की, निधी नसल्याने त्यांना साधी ट्रान्सफॉर्मरची कामेही करता येत नव्हती. तर हिंगोलीचे नागेश पाटील-आष्टीकर यांनी निधी मिळत नसल्याने विकासकामे अडली होती, असा दावा केला होता. पण आकडेवारीवरून स्पष्ट दिसते की, त्यांना निधी मिळाला होता. मात्र तो निधी खर्च करून लोकोपयोगी कामे करण्यात त्यांनी रसच दाखवला नाही. मात्र धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना 18.47 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी प्रत्यक्ष खर्च झाले फक्त 1 कोटी 97 लाख रुपये. म्हणजे 16 कोटी 49 लाख रुपये निधी शिल्लक आहे. यात त्यांना ट्रान्सफॉर्मरची कामे करता येईनात? त्यांना 130 कामे करायची होती. पण त्यांनी 21 कामे पूर्ण केली आहेत. शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांना 14 कोटी 70 लाख रुपये इतका निधी मंजूर होता. त्यांनी 71 लाख रुपयांचा खर्च केला. पण 135 पैकी फक्त 2 कामे केली. त्यांचा 13 कोटी 98 लाख रुपयांचा निधी पडून आहे.

हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांना मंजूर झालेल्या 19 कोटी 2 लाख रुपये निधींपैकी 5 कोटी 2 लाख रुपये खर्च केले आहेत. 79 पैकी त्यांनी 28 कामे केली असून त्यांच्याकडे 13 कोटी 95 लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख याचा मंजूर निधी 18 कोटी 60 लाख रुपये असून प्रत्यक्ष खर्च 1 कोटी 41 लाख रुपये झाला आहे. त्यांनी 106 पैकी 7 पूर्ण केलेली असून 17 कोटी 14 लाख रुपये निधी शिल्लक आहे. परभणीचे संजय जाधव यांनी मंजूर निधी 14 कोटी 70 लाख रुपये आहे. या निधीपैकी प्रत्यक्ष 3 कोटी 78 लाख रुपये निधी वापरला आहे. 10 कोटी 91 लाख रुपयांचा निधी वापराविना शिल्लक आहे. सर्वात मोठी तफावत ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील यांच्या विकास निधीबाबत आहे. त्यांना 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यांनी केवळ 5 लाख 59 हजार रुपयांचा खर्च केला. 40 कामांपैकी त्यांनी एकही काम पूर्ण केले नाही.त्यांच्याकडे 14 कोटी 54 लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे.


या निधी वापराची माहिती जाहीर होताच विरोधकांनी बंडखोर खासदारांवर टीकेची झोड उठवली. उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, निधीसाठी पक्ष सोडून गेलो असे म्हणणार्यांचे आकडे समोर आले आहेत. मतदारांसाठी जो निधी दिला तो धड वापरू शकलेले नाहीत. 15-16 कोटींचा निधी पडून आहे. हा विकासकामांचा निधी आहे. तो निधी का वापरला गेला नाही? आता कोणत्या निधीसाठी? कोणत्या विकासासाठी गेला आहात?


काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, निधी मिळूनही खर्च केलेला नाही. तरीही निधी मिळत नाही अशी बोंब मारणे चुकीचे आहे. या खासदारांना शासकीय निधी मिळत होता. परंतु वैयक्तिक निधी मिळत नव्हता, असा त्यांच्या म्हणण्याचा रोख असावा. तर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के बंडखोर खासदाराची बाजू घेताना म्हणाले की, एका खासदाराला वर्षाला 5 कोटींचा निधी मिळतो. त्यातील 50 लाख जीएसटीत जातात. बरचसे खासदार चौथ्या किंवा पाचव्या वर्षात कामे करायला सुरुवात करतात. 15-16 कोटींचा निधी एकत्र जमला की एकदम काम करतात. म्हणजे लोकसभा मतदारसंघातील, सर्व विधानसभा मतदारसंघातील कामे करता येतात. सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून हे असे केले जाते. ही तांत्रिक गोष्ट आहे, समजून घ्या.

आकडेवारी खोटी! फुटीरांचा खुलासा


विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, खासदार निधीचा हिशेब मुदत संपण्यापूर्वी करणे चुकीचे आहे. खासदार निधी 5 वर्षांसाठी मिळतो. माझ्या पहिल्या टर्मचा (2019 ते 2024) हिशेब करा. या पाच वर्षांत मला मिळालेल्या खासदार निधीमधला एक पैसाही अखर्चित राहिलेला नाही, याची माहिती कुणीही अधिकृत वेबसाईटवरून काढू शकते. सध्याच्या कार्यकाळाचा हिशेब 2029 च्या मार्चनंतर करा, तेव्हा जर निधी शिल्लक राहिला तर मला जाब विचारा. नागेश पाटील आष्टीकर यांनीही आपली बाजू मांडताना म्हटले की, मी कार्यकर्त्यांच्या कामासाठीच आणि विकासासाठीच शिवसेनेत गेलो आहे.

मला दोन वर्षांत 19 कोटी निधी मंजूर झाला हा आकडा खोटा आहे. खासदाराला पाच कोटी मिळतात. मग दोन वर्षांत 19 कोटी कसे मिळणार? खासदारांना 5 कोटी मिळतात. पण ते कमी आहेत, असे माझे म्हणणे आहे. प्रत्येक गावात गेलो की, तिथले लोक मागणी करतात. मुंबईत कामे झाली नाही तर नगरसेवकाला विचारले जाते. पण इथे लाईट गेली तरी खासदाराला फोन येतो. (निधी किती खर्च केला हा आकडा खोटा आहे असे त्यांचे म्हणणे आहे, पण निधी मिळाला होता हे त्यांना मान्य करावेच लागेल.)


Web Title:
संबंधित बातम्या