Cristiano Ronaldo Record: फुटबॉल जगतातील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांना मैदानातील कामगिरीतून चोख उत्तर दिले आहे. उझबेकिस्तानविरुद्ध खेळवल्या गेलेल्या ‘ग्रुप के’ मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात रोनाल्डोने २ शानदार गोल करत पोर्तुगालला 5-0 असा दणदणीत विजय मिळवून दिला.
या दोन गोलसह रोनाल्डोने फुटबॉल इतिहासातील अशा एका महाविक्रमाला गवसणी घातली आहे, जिथे आजवर जगातील कोणताही खेळाडू पोहोचू शकलेला नाही.
गेल्या सामन्यात काँगो डीआर विरुद्ध झालेल्या बरोबरीनंतर रोनाल्डोच्या वाढत्या वयावर आणि फॉर्मवर जोरदार टीका होत होती. मुख्य प्रशिक्षकांच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. गेल्या १० आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून रोनाल्डोला एकही गोल करता आला नव्हता. मात्र, उझबेकिस्तानविरुद्ध सामन्याच्या ६ व्या मिनिटालाच पहिला गोल करत त्याने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. त्यानंतर उत्तरार्धात आणखी एक गोल करत त्याने संघाचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.
६ विश्वचषक आणि प्रत्येक स्पर्धेत गोल; मेस्सीही राहिला मागे
या ऐतिहासिक कामगिरीसह ४१ वर्षीय रोनाल्डोने अनेक मोठे मैलाचे दगड पार केले आहेत:
- एकमेव ६ वेळचा गोलशूटर: रोनाल्डोने २००६, २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि आता २०२६ अशा सलग ६ वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करण्याचा अद्भूत विक्रम केला आहे.
- मेस्सीपेक्षा कुठे पुढे?: लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे दोघेही ६ विश्वचषक खेळणारे जगातील एकमेव पुरुष खेळाडू आहेत. मात्र, मेस्सीला २०१० च्या दक्षिण आफ्रिका विश्वचषकात एकही गोल करता आला नव्हता. रोनाल्डोने मात्र खेळलेल्या प्रत्येक विश्वचषकात गोल नोंदवण्याचा पराक्रम केला आहे.
- इतिहासातील दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू: वयाच्या 41 वर्षे आणि 138 दिवसांचा असलेला रोनाल्डो विश्वचषकात गोल करणारा इतिहासातील दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर कॅमेरूनचा रॉजर मिला (42 वर्षे 39 दिवस) आहे.
- २३० वा आंतरराष्ट्रीय सामना: रोनाल्डोच्या कारकिर्दीतील हा 230 वा आंतरराष्ट्रीय सामना होता, जो पुरुष फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक आहे. पोर्तुगालसाठी त्याचे आता एकूण 145 गोल झाले आहेत.
“लोकांसाठी मी कधीही निवृत्त होतो”; विजयानंतर रोनाल्डोची भावूक प्रतिक्रिया
सामन्यानंतर मनातील खदखद व्यक्त करताना रोनाल्डो म्हणाला, “हा आठवडा माझ्यासाठी आणि संघासाठी खूप कठीण होता. सर्वजण आमच्यावर कडाडून टीका करत होते. जेव्हा गोष्टी चांगल्या घडतात तेव्हा सर्व कौतुक करतात, पण एक सामना खराब झाला की लोक म्हणतात रोनाल्डो म्हातारा झाला, तो निवृत्त झाला. मी या क्षेत्रात २३ वर्षांपासून आहे, त्यामुळे मला याने फरक पडत नाही. देव नेहमी कष्ट करणाऱ्यांना मदत करतो.”
या विजयासह पोर्तुगालने गटामध्ये ४ गुण मिळवून आपले स्थान मजबूत केले आहे. आता त्यांचा पुढील आणि शेवटचा गट सामना शनिवारी मियामी येथे कोलंबियाविरुद्ध होणार आहे. रोनाल्डोचा हा बहुदा शेवटचा विश्वचषक असून, आपल्या शेवटच्या स्पर्धेतही तो नवनवीन रेकॉर्ड्स प्रस्थापित करत आहे.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित










