Iran’s attack : होर्मुज सामुद्रधुनीतील एका व्यावसायिक तेलवाहू जहाजावरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले. यानंतर इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने दावा केला की, या कारवाईत अमेरिकेच्या आठ महत्त्वाच्या लष्करी तळांचा नाश करण्यात आला. या ताज्या संघर्षामुळे अमेरिका-इराण युद्धविराम कोलमडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने शनिवारी उशिरा बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा केला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या नौदल आणि हवाई दलाने कुवेतमधील अली अल सालेम एअर बेस येथे तैनात अमेरिकी सैन्य तसेच बहरीनची राजधानी मनामा येथील पोर्ट सलमान येथे असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्यावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. इराणने हा हल्ला अमेरिकेने इराणच्या किनारपट्टीवरील पाच ठिकाणांवर केलेल्या बॉम्बहल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर कुवेत आणि बहरीननेही आपल्या हद्दीत शत्रुत्वपूर्ण क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा धोका असल्याची माहिती दिली. कुवेतच्या लष्कराने देशाची हवाई संरक्षण यंत्रणा शत्रूच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा सामना करत असल्याचे सांगितले. नागरिकांनी सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले. तर बहरीनच्या गृह मंत्रालयाने इशारा देणारे सायरन वाजवण्यात आल्याचे सांगत नागरिकांना शांत राहून जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे अमेरिकेने हल्ले केले. त्यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, एक वेळ अशी येऊ शकते की, आम्हाला संयम बाळगणे शक्य होणार नाही, असा इशाराही दिला. या घडामोडींमुळे या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी करारावर गंभीर परिणाम झाल्याचे मानले जात आहे.










