Lohagad Death Case : लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून ढकलून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाचा (Ketan Agarwal Murder Case) तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या गुन्ह्याची अत्यंत थरारक आणि अंगावर काटा आणणारी पार्श्वभूमी समोर येत आहे. मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने १८ जून रोजी केतनला कड्यावरून ढकलून दिले होते. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या सियाची जेव्हा सखोल चौकशी करण्यात आली, तेव्हा तिने दिलेली कबुली ऐकून स्वतः पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. सियाला केतनसोबत केवळ लग्नच टाळायचे नव्हते, तर त्याच्यासोबत एकाच खोलीत व्यतीत करावा लागणारा वेळही मान्य नव्हता. हा मुक्काम टाळण्यासाठी तिने थेट आंतरराष्ट्रीय ‘प्री-वेडिंग फोटोशूट’ रद्द करण्यापासून ते थेट केतनचा काटा काढण्यापर्यंतची क्रूर मजल मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
वाढदिवसाचा मुक्काम टाळण्यासाठी आदल्याच दिवशी मृत्यूचा सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांच्या विवाहसोहळ्याची दोन्ही कुटुंबीयांकडून जय्यत तयारी सुरू झाली होती. विवाह सोहळ्यासाठी लागणारे कार्यालय (लॉन्स) आणि इतर सर्व आवश्यक बुकिंग पूर्ण झाले होते. दरम्यान, १९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस संस्मरणीय आणि विशेष ठरवण्यासाठी केतनने महाबळेश्वर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये खास सेलिब्रेशन आणि मुक्कामाचे (नाईट स्टे) नियोजन केले होते.
मात्र, या सहलीदरम्यान केतनसोबत एकाच खोलीत राहावे लागेल या विचाराने सिया प्रचंड अस्वस्थ झाली होती. केतनसोबतचा हा मुक्काम कोणत्याही परिस्थितीत टाळायचा, याच एका विकृत मानसिकतेतून तिने वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनला फिरण्याच्या बहाण्याने नेले. तिथे तिने आधीच दबा धरून बसलेल्या आपला प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनचा कड्यावरून ढकलून गेम केला.
‘बाली’ दौरा रद्द करण्यासाठी थेट केतनचा पासपोर्ट टॉयलेटमध्ये फेकला
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत समोर आले की, केतनसोबत राहणे किंवा त्याच्यासोबतचा एकांत टाळण्याची सियाची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी ६ जून रोजी हे जोडपे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी इंडोनेशियातील ‘बाली’ येथे जाणार होते. विमानाची तिकिटे आणि हॉटेलचे आरक्षण (बुकिंग) सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, बाली दौऱ्यातही केतनसोबत एकत्र राहावे लागेल या भीतीने सियाने एक कुटील डाव आखला होता. तिने केतनला कोणताही सुगावा लागू न देता गुपचूप त्याच्या बॅगेतून त्याचा पासपोर्ट चोरला आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर फूड मॉलच्या स्वच्छतागृहात (टॉयलेट) फेकून दिला. ऐनवेळी पासपोर्ट अचानक गहाळ झाल्यामुळे केतनला आपला बाली दौरा रद्द करावा लागला होता. त्यावेळी सियाचा हा कट पूर्णपणे यशस्वी ठरला होता.
वाढलेल्या आत्मविश्वासाने घेतला केतनचा बळी
बाली दौरा कोणत्याही संशयाशिवाय यशस्वीपणे रद्द केल्यामुळे सियाचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. आपण रचलेले कट कोणाच्याही लक्षात येत नाहीत, असा तिचा समज झाला होता. मात्र, त्यानंतर लगेचच समोर आलेल्या महाबळेश्वरच्या मुक्कामाचे नियोजन रद्द करण्यासाठी तिच्याकडे कोणताही सोपा मार्ग उरला नव्हता. अखेर, केतनसोबत एका खोलीत राहण्यापेक्षा तिने त्याला या जगातूनच कायमचे संपवण्याचा सर्वात भयानक आणि टोकाचा मार्ग निवडला.
पोलीस कारवाई-
या संपूर्ण धक्कादायक कबुलीनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस अत्यंत सतर्क झाले असून, या गुन्ह्याची साखळी जोडण्यासाठी आणि न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक तपास करत आहेत.










