LA 2028 Olympics: लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाल्याचे निश्चित झाल्यापासून, भारतीय संघ यामध्ये कसा पात्र ठरणार, हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) क्रिकेटच्या अधिकृत पात्रता नियमांना मंजुरी देत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
या ऐतिहासिक स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागांत प्रत्येकी केवळ 6 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यजमान देश म्हणून अमेरिकेचा (USA) एक जागा राखीव असेल, जर त्यांचा संघ पात्रता कालावधीत जगातील पहिल्या 15 क्रमांकात राहिला तर. उर्वरित 5 जागांसाठी जगभरातील संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघांसाठी ऑलिम्पिक गाठण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे ऑलिम्पिक तिकीट पक्के!
भारतीय क्रीडाप्रेमींसाठी सर्वात मोठी गूड न्यूज म्हणजे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेसाठी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे.
- टी20 विश्वचषकाचा फायदा: सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात आशिया खंडातील सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ म्हणून भारताने ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.
- धावगतीच्या बळावर बाजी: ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. आशियाई संघांमध्ये भारत आणि श्रीलंका आपापल्या गटात ६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मात्र, श्रीलंकेच्या उणे 0.725 नेट रन रेटच्या तुलनेत भारताचा नेट रन रेट अधिक 1.718 असा सर्वोत्तम राहिल्याने भारताला हे तिकीट मिळाले. ५ जुलै रोजी विश्वचषक संपल्यानंतर आयसीसी यावर अधिकृत शिक्कामोर्तब करेल.
भारतीय पुरुष संघासमोर ‘आशियात अव्वल’ राहण्याचे आव्हान
भारतीय पुरुष क्रिकेट संघाला ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी आयसीसी टी20 रँकिंगवर अवलंबून राहावे लागणार आहे. पुरुषांसाठी पात्रता मिळवण्याचे २ प्रमुख मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
- १. आयसीसी टी20 रँकिंग मार्ग (थेट पात्रता): रँकिंगच्या माध्यमातून एकूण 4 संघांना प्रवेश मिळेल. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओशनिया या ४ खंडांतील अव्वल स्थानी असलेल्या प्रत्येकी एका सर्वोत्तम संघाला थेट ऑलिम्पिक तिकीट दिले जाईल. याचा अर्थ भारताला ऑलिम्पिकमध्ये थेट पोहोचण्यासाठी आशिया खंडात पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर राहावे लागेल. या पात्रतेचा कालावधी 30 जून 2026 पासून सुरू झाला असून तो 31 डिसेंबर 2026 पर्यंत खुला राहील.
- २. जागतिक पात्रता स्पर्धा मार्ग (शेवटची संधी): जर भारतीय संघ रँकिंगमध्ये आशियात अव्वल राहू शकला नाही, तर त्याला ‘फायनल ऑलिम्पिक ग्लोबल क्वालिफिकेशन टूर्नामेंट’ या विशेष स्पर्धेत खेळावे लागेल. रँकिंगमधील पुढील ८ सर्वोत्तम पात्र संघ या स्पर्धेत खेळतील आणि या स्पर्धेचा विजेता संघ ऑलिम्पिकची शेवटची म्हणजेच ६ वी जागा पटकावेल.
१२८ वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन; पोमोना येथे रंगणार सामने
ऑलिम्पिकच्या इतिहासात तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. यापूर्वी 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव सामना खेळवला गेला होता, ज्यामध्ये ब्रिटनने फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. आता प्रथमच पुरुष आणि महिलांचे टी20 सामने ऑलिम्पिकच्या मंचावर खेळवले जाणार आहेत. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील सर्व क्रिकेट सामने 12 ते 29 जुलै दरम्यान पोमोना येथील फेअरग्राउंड्सवर खास उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्टेडियममध्ये आयोजित केले जातील.
हे देखील वाचा – Gold Price Drop India: लोक सोन्याचे दागिने मोडीत का काढत आहेत? सराफा बाजारातील ‘या’ मोठ्या बदलाचे कारण जाणून घ्या











