Maharashtrian Chakolya Recipe : पावसाळा सुरू झाला की गरमागरम आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. रोजच्या भाजी-पोळीला कंटाळा आला असेल तर महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ चकोल्या (वरणफळ) नक्की करून पाहा. तुरीच्या डाळीची आंबट-गोड आमटी आणि गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या चकोल्या यांचा स्वाद म्हणजे पावसाळ्यातील खास मेजवानीच!
चकोल्या हा पदार्थ महाराष्ट्रातील (Maharashtrian Food)अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या बनवला जातो. कमी साहित्यामध्ये, कमी वेळात तयार होणारा आणि पोटभर समाधान देणारा हा पदार्थ आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
चकोल्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कणकेसाठी:
- २ वाट्या गव्हाचे पीठ
- चवीनुसार मीठ
- १ छोटा चमचा तेल
आमटीसाठी:
- १ वाटी शिजवलेली तूरडाळ
- १ ते २ चमचे गोडा मसाला
- चिंच-गुळाचा कोळ (किंवा आमसूल)
- चवीनुसार मीठ
- हळद
फोडणीसाठी:
- २ चमचे तेल किंवा तूप
- १/२ चमचा मोहरी
- १/२ चमचा जिरे
- हिंग
- कढीपत्ता
- ठेचा किंवा लाल तिखट
इतर साहित्य:
- आवश्यकतेनुसार पाणी
- बारीक चिरलेली कोथिंबीर
चकोल्या बनवण्याची कृती
१) तूरडाळ शिजवून घ्या
सर्वप्रथम तूरडाळ स्वच्छ धुऊन त्यामध्ये हळद, हिंग आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.
२) कणिक तयार करा
चकोल्यांसाठी गव्हाच्या पिठामध्ये आलं-लसूण-मिरची पेस्ट, हळद, थोडे तेल आणि चवीनुसार मीठ घालून घट्टसर कणिक मळून घ्या.
३) चविष्ट वरण तयार करा
पातेले गॅसवर गरम करून त्यामध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या.
यानंतर त्यात वाटलेले मसाले, थोडी हळद आणि एक चमचा काळा मसाला घालून चांगले परतून घ्या. त्यामध्ये शिजवलेली डाळ, आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून वरणाला चांगली उकळी आणा.
४) चकोल्या कापा
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला थोडे तेल लावून नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड आणि मोठी पोळी लाटा.
पोळी लाटताना तेल लावल्यामुळे चकोल्यांचे तुकडे एकमेकांना चिकटत नाहीत. त्यानंतर सुरीच्या मदतीने पोळीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे कापून घ्या.
५) वरणात चकोल्या शिजवा
तिखट वरणाला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक-एक करून चकोल्यांचे तुकडे सोडा.सर्व चकोल्या वरणात टाकल्यानंतर त्या मध्यम आचेवर शिजू द्या. अधूनमधून चमच्याने हलवत राहा, जेणेकरून चकोल्या तळाला चिकटणार नाहीत.साधारण १० मिनिटांनंतर चकोल्या वरणात व्यवस्थित बुडतील आणि वरण दाटसर होईल. यावरून चकोल्या शिजल्या आहेत असे समजावे.
गरमागरम चकोल्या अशा करा सर्व्ह
तयार झालेल्या चकोल्यांवर साजूक तुपाची धार सोडा आणि गरमागरम सर्व्ह करा. सोबत पापड, लोणचे किंवा कांदा दिल्यास चव आणखी वाढते.
खास टिप्स
चकोल्या जितक्या मऊ आणि ताज्या असतील तितकी त्यांची चव अधिक खुलते.
कणिक मळताना थोडा ओवा, लाल तिखट आणि हळद घातल्यास चकोल्यांना वेगळी चव येते.
आमटीला आंबट चव देण्यासाठी चिंचेऐवजी आमसूल वापरू शकता.
हे देखील वाचा –
Tilorya Recipe : पारंपरिक तिलोऱ्या: आठवणी, चव आणि पोषणाचा संगम
Onion Chutney Recipe: इडली-डोशासाठी बनवा हॉटेलसारखी चटकदार कांद्याची चटणी, पाहा सोपी रेसिपी










