Diet Coke Shortage: उन्हाळ्याचा तडाखा वाढू लागला असून शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण ‘डायट कोक’च्या (Diet Coke) सिलव्हर कॅनला पसंती देतात. मात्र, यावर्षी हा थंडगार अनुभव मिळणे कठीण झाले आहे.
अनेक शहरांमधील दुकानांच्या शेल्फमधून डायट कोक गायब झाला असून, यामागे केवळ स्टॉक संपणे हे साधे कारण नसून एक मोठे जागतिक संकट आहे. ॲल्युमिनियमचा तुटवडा आणि मध्य पूर्वेतील युद्धामुळे (Middle East War) तुमच्या आवडीच्या ड्रिंकवर गदा आली आहे.
कोल्ड्रिंक नाही, तर ‘कॅन’चा तुटवडा
समस्या पेयामध्ये नाही, तर ते ज्या डब्यात (कॅन) येते त्यामध्ये आहे. डायट कोक प्रामुख्याने ॲल्युमिनियम कॅनवर अवलंबून असतो. इतर शीतपेये प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये सहज उपलब्ध होतात, पण डायट कोकची ओळखच त्याचे कॅन आहेत. गेल्या वर्षभरात साखरमुक्त पेयांची मागणी दुप्पट झाली आहे, पण ॲल्युमिनियमच्या पुरवठ्यात अडथळे आल्याने मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बिघडला आहे.
जागतिक बाजारपेठेत ॲल्युमिनियमचा ‘शॉक’
लंडन मेटल एक्सचेंजमध्ये ॲल्युमिनियमच्या किमती 4 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत याची किंमत 3,672 डॉलर्स प्रति टन, तर भारतात सुमारे 375 रुपये प्रति किलोपर्यंत गेली आहे. तज्ज्ञांच्या मते, 2000 सालांनंतरचा हा धातू बाजारपेठेतील सर्वात मोठा पुरवठा धक्का आहे. याला ‘ब्लॅक स्वान’ इव्हेंट (Black Swan Event) म्हटले जात आहे, ज्याचा अंदाज कोणीही वर्तवला नव्हता.
मध्य पूर्वेतील युद्धाचा संबंध काय?
इराणचा समावेश असलेल्या युद्धामुळे जागतिक ॲल्युमिनियम पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मध्य पूर्वेतील देशांकडे जगातील सुमारे 9% ॲल्युमिनियम उत्पादन क्षमता आहे. युद्धामुळे सागरी वाहतुकीचे मार्ग विस्कळीत झाले असून विमा आणि मालवाहतुकीचा खर्च वाढला आहे. यामुळे कच्च्या मालाची हालचाल थांबली असून पुरवठ्यात मोठी घट झाली आहे.
जेन-झी आणि सोशल मीडियावर चर्चा
विशेषतः तरुण पिढीमध्ये (Gen Z) डायट कोकची मोठी क्रेझ आहे. साखरेचे प्रमाण कमी असल्याने अनेकजण याला पसंती देतात. आता पुरवठा कमी झाल्याने इन्स्टाग्राम आणि X (ट्विटर) वर या तुटवड्याची चर्चा सुरू झाली आहे. काही ठिकाणी लोक साठा करून ठेवत असल्याने टंचाई अधिकच जाणवत आहे.
एकंदरीत, जगाच्या एका कोपऱ्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील एका ग्राहकाला उन्हाळ्यात त्याचे आवडते पेय मिळेनासे झाले आहे. हे जागतिक पुरवठा साखळी (Supply Chain) किती एकमेकांशी जोडलेली आहे, याचे उत्तम उदाहरण आहे.
हे देखील वाचा –










