Gautam Adani US Case: भारतीय अब्जाधीश आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासाठी अमेरिकेतून एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. अमेरिकेतील डोनल्ड ट्रम्प प्रशासनाने गौतम अदानी यांच्यावरील फसवणुकीचे फौजदारी गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच अदानी यांच्या एका कंपनीशी संबंधित इराणवरील निर्बंधांच्या उल्लंघनाचा खटलाही तडजोडीने मिटवण्यात आला आहे. या कायदेशीर घडामोडींमुळे अदानी समूहावर गेल्या काही काळापासून असलेले मोठे संकट टळले आहे.
न्यायालयाच्या अधिकृत नोंदीनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाने अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील लाचखोरीचे फौजदारी आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे. हा संपूर्ण वाद भारतातील एका सर्वात मोठ्या सोलर पॉवर प्रोजेक्टशी संबंधित होता.
Gautam Adani US Case: गुन्हे मागे घेण्यामागचे मुख्य कारण काय?
हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा काही आठवड्यांपूर्वीच गौतम अदानी यांच्या वकिलांनी (जे अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक वकील देखील आहेत) अधिकाऱ्यांना सांगितले होते की, अदानी समूह अमेरिकेत 10 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. परंतु, हा कायदेशीर वाद जोपर्यंत मिटत नाही, तोपर्यंत ही गुंतवणूक पुढे नेणे शक्य नव्हते.
बायडेन प्रशासनाच्या काळात सुरू झालेले अनेक हाय-प्रोफाइल खटले ट्रम्प प्रशासन आता मागे घेत आहे, हेच या निर्णयावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Gautam Adani US Case: नक्की काय होते आरोप?
- लाचखोरीचे आरोप: अमेरिकन सरकारी वकिलांनी आरोप केला होता की, भारतातील एका महाकाय सोलर पॉवर प्रोजेक्टला मंजुरी मिळवण्यासाठी अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना 265 दशलक्ष डॉलरची लाच देण्याचा कट रचला होता.
- गुंतवणूकदारांची फसवणूक: हा कथित भ्रष्टाचार लपवून अदानी यांनी आंतरराष्ट्रीय कर्जदार आणि गुंतवणूकदारांकडून 3 अब्ज डॉलरपेक्षा जास्त निधी उभारल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. अदानी समूहाने हे सर्व आरोप पहिल्यापासूनच फेटाळून लावले होते.
इराण निर्बंध प्रकरणात २७५ दशलक्ष डॉलरची तडजोड
या गुन्हेगारी खटल्या व्यतिरिक्त, अदानी एंटरप्रायझेसवर इराणकडून लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी खरेदी करून अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता.
- खरेदीचे स्वरूप: नोव्हेंबर 2023 ते जून 2025 दरम्यान अदानी यांच्या कंपनीने दुबईतील एका व्यापाऱ्याकडून 191 दशलक्ष डॉलरचा एलपीजी खरेदी केला होता. हा गॅस ओमान आणि इराकचा असल्याचे भासवण्यात आले होते, पण प्रत्यक्षात तो इराणमधून आला होता.
- कारवाई आणि तडजोड: अमेरिकेच्या तिजोरी विभागाने म्हटले आहे की, कंपनीने जहाजांची योग्य तपासणी केली नाही आणि धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आता हा वाद मिटवण्यासाठी अदानी एंटरप्रायझेस अमेरिकेला 275 दशलक्ष डॉलरचा दंड म्हणजेच सेटलमेंट रक्कम देण्यास तयार झाली आहे.
यासोबतच, अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) अदानी यांच्या विरोधातील दिवाणी खटलाही तडजोडीने मिटवला आहे, ज्याला आता न्यायालयाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. ‘फोर्ब्स’च्या मते 82 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांच्यासाठी हा निर्णय जागतिक बाजारपेठेत त्यांची पत पुन्हा वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
हे देखील वाचा – Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका! 5 दिवसातच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ









