IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२६ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) सुमार कामगिरीनंतर, संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकपदाबाबत मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत. इंग्लंडचा माजी धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसन याने केलेल्या एका दाव्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. पीटरसनच्या मते, इंग्लंडच्या कसोटी संघाला ‘बॅझबॉल’ची नवी ओळख देणारे ब्रेंडन मॅककुलम पुढील हंगामात पुन्हा एकदा केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होऊ शकतात. पीटरसनने सोशल मीडियावर अत्यंत ठामपणे हे विधान करत चाहत्यांना त्याचे भाकीत लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आहे.
मॅककुलम यांचा केकेआरमधील यशस्वी वारसा-
ब्रेंडन मॅककुलम यांनी यापूर्वी २०२० ते २०२२ या कालावधीत कोलकाता नाईट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२१ च्या हंगामात संघाने अत्यंत जिद्दीने खेळ करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यांची आक्रमक रणनीती आणि खेळाडूंमध्ये निर्भयता निर्माण करण्याची शैली केकेआरच्या पथ्यावर पडली होती. मात्र, सध्या मॅककुलम हे इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाचे तिन्ही फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांचा करार २०२७ पर्यंत आहे. अशा परिस्थितीत, ते हा करार सोडून पुन्हा आयपीएलकडे वळणार का, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अभिषेक नायर यांच्यापुढील आव्हाने आणि टीकेचा धनी-
२०२६ च्या हंगामासाठी केकेआरने चंद्रकांत पंडित यांच्या जागी अभिषेक नायर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. २०१८ पासून संघाशी मार्गदर्शक म्हणून जोडले गेलेल्या नायर यांच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चालू हंगामात कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. काल १७ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या पराभवामुळे केकेआर गुणतालिकेत तळाला फेकली गेली आहे. या खराब कामगिरीमुळे नायर यांच्या प्रशिक्षण कौशल्यावर आणि रणनीतीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
भविष्यातील निर्णयांकडे चाहत्यांचे लक्ष-
संघाची सध्याची विस्कळीत अवस्था पाहता, फ्रँचायझी व्यवस्थापन काही कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर मॅककुलम यांच्या संभाव्य पुनरागमनावरून चाहत्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काही जण त्यांच्या ‘बॅझ’ शैलीच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहेत, तर काही जण त्यांच्या इंग्लंडसोबतच्या कराराचा हवाला देत ही शक्यता नाकारत आहेत.










