Home / महाराष्ट्र / Aaditya Thackeray : कार्याध्यक्षपदाच्या चर्चांना पूर्णविराम; आदित्य ठाकरें स्पष्टच बोलले; महाबळेश्वर २००३ ची आठवण ताजी..

Aaditya Thackeray : कार्याध्यक्षपदाच्या चर्चांना पूर्णविराम; आदित्य ठाकरें स्पष्टच बोलले; महाबळेश्वर २००३ ची आठवण ताजी..

Aaditya Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली जाणार...

By: Team Navakal
Aaditya Thackeray
Social + WhatsApp CTA

Aaditya Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याच्या चर्चांनी आज, बुधवारी १५ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उधाण आले होते. आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या ‘कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ती होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, आता खुद्द आदित्य ठाकरे यांनीच या सर्व चर्चांवर अधिकृतपणे पडदा टाकला आहे.

राजकीय वर्तुळातील चर्चा आणि तर्कवितर्क-
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल होणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा देऊन त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. विशेषतः आगामी १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या मोठ्या निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता माध्यमांमधून व्यक्त केली जात होती. २००३ मध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली होती, त्याच धर्तीवर आदित्य ठाकरेंची नियुक्ती करून पक्षाला नवी ऊर्जा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात होते.

आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण आणि अफवांना छेद-
मात्र, या सर्व बातम्या केवळ चर्चाच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सद्यस्थितीत अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयावर पक्षात अधिकृत विचार सुरू नसल्याचे त्यांच्याकडून सूचित करण्यात आले आहे. केवळ पदापेक्षा पक्ष संघटना मजबूत करणे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे, यालाच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

समाजमाध्यमांवरील थेट स्पष्टीकरण
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत स्पष्ट शब्दांत नमूद केले की, “आज सकाळपासून काही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मला पक्षात विशिष्ट पद दिले जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र, या बातम्यांमध्ये तथ्य नाही आणि अशी कोणतीही चर्चा पक्षांतर्गत स्तरावर सुरू नाही.” त्यांनी पुढे सर्व माध्यमांना विनंती केली आहे की, अशा निराधार बातम्यांची दखल घेऊ नये आणि अफवा पसरवणे थांबवावे. त्यांच्या या स्पष्टोक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता आता शांत झाली आहे.

माध्यमांमध्ये रंगल्या होत्या चर्चा-
सकाळपासून राजकीय वर्तुळात अशा चर्चा होत्या की, आगामी १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली जाईल. विशेषतः आगामी निवडणुका आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी लक्षात घेता, तरुण नेतृत्वाकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असा कयास लावला जात होता. मात्र, आदित्य ठाकरेंनी स्वतःहून समोर येत या वृत्ताचा इन्कार केल्याने या केवळ कपोलकल्पित कथा असल्याचे सिद्ध झाले आहे.

वर्धापन दिनाकडे सर्वांचे लक्ष-
जरी आदित्य ठाकरे यांनी सध्या या चर्चा फेटाळून लावल्या असल्या, तरी १९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता नवा संदेश देतात आणि संघटनात्मक पातळीवर काही बदल होतात का, याची उत्सुकता कायम आहे.

वाढते राजकीय महत्त्व आणि अधिकार-
आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि राज्यव्यापी दौऱ्यांच्या माध्यमातून शिवसैनिकांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आदित्य ठाकरेंनी जरी या चर्चा फेटाळल्या असल्या तरी भविष्यात जर त्यांच्याकडे हे पद गेले तर कार्याध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आल्यास पक्षांतर्गत त्यांचे महत्त्व आणि वजन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या पदामुळे त्यांच्याकडे संघटनात्मक निर्णय घेण्याचे, पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्याचे आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्याचे व्यापक अधिकार प्राप्त होतील. शिवसेनेच्या इतिहासात यापूर्वीही अशा प्रकारच्या नियुक्त्यांनी राजकारणाची दिशा बदलली आहे.

उद्धव ठाकरेंप्रमाणेच आता आदित्य ठाकरेंकडेही शिवसेनेची धुरा अफवांना पूर्णविराम-
सन २००३ मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या ऐतिहासिक अधिवेशनात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘कार्याध्यक्ष’ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली जाणार अशी अफवा सुरु होती त्या सगळ्या अफवांना आदित्य ठाकरेनी पूर्णविराम दिला आहे.

२००३ च्या घटनेची पुनरावृत्ती शक्यता मावळी-
राजकीय वर्तुळात या संभाव्य निर्णयाची तुलना २००३ सालच्या महाबळेश्वर अधिवेशनाशी केली जात आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून भविष्यातील नेतृत्वाचे संकेत दिले होते.

तरुण नेतृत्वाखाली नव्या फळीची बांधणी-
आदित्य ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपद सोपवण्यामागे केवळ पदोन्नती हा उद्देश नसून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पक्षाची एक ‘नवी फळी’ उभारण्याचा मानस ठाकरे गटाचा असल्याचे बोलले जात होते. तरुण मतदारांशी असलेला त्यांचा संवाद आणि आधुनिक राजकारणाची जाण यामुळे भविष्यात शिवसेना अधिक व्यापक होईल, अश्या चर्चा देखील होत्या.

ऐतिहासिक वारसा आणि भविष्यातील पाऊल-
ज्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २००३ मध्ये कार्याध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारून राजकारणात आपले स्थान भक्कम केले होते, त्याच मार्गावरून आदित्य ठाकरे आता एक पाऊल पुढे टाकणार अशी चर्चा होती.

तरुण पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याची हीच योग्य वेळ; संजय राऊत यांची आदित्य ठाकरेंच्या संभाव्य नियुक्तीवर प्रतिक्रिया-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पक्षाच्या ‘कार्याध्यक्ष’ पदाची जबाबदारी दिली जाण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी देखील आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे. “पुढील काळातील राजकारण हे तरुण पिढीच्याच हातात गेले पाहिजे,” असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य पदोन्नतीचे संकेत दिले होते का? अशी चर्चा होती.

ऐतिहासिक दाखला आणि नेतृत्वाचा वारसा-
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचा दाखला दिला. ते म्हणाले की, “आदरणीय उद्धवजी देखील एका विशिष्ट काळानंतर पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. ही एक संघटनात्मक प्रक्रिया आहे. जर प्रसारमाध्यमांतून आदित्य ठाकरे यांचे नाव या पदासाठी समोर येत असेल, तर त्याचे निश्चितपणे स्वागत व्हायला हवे.” पक्ष संघटनेत नव्या रक्ताला वाव देणे आणि त्यांच्याकडे जबाबदारी सोपवणे, हा पक्षाच्या हिताचाच निर्णय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आदित्य ठाकरे यांच्या कामाची पावती-
आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्षमतेबद्दल भाष्य करताना राऊत यांनी विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील त्यांच्या कामगिरीचा उल्लेख केला. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने नियोजित आणि प्रभावी काम केले आहे, ते कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. “आदित्य ठाकरेंबद्दल काही लोक खासगीत काय बोलतात, याला राजकीय क्षेत्रात काडीचाही अर्थ नसतो. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून त्यांनी केलेले काम आणि त्यांना मिळणारा जनप्रतिसाद हाच त्यांच्या नेतृत्वाचा खरा पुरावा आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला.

ऐतिहासिक महाबळेश्वर अधिवेशन: उद्धव ठाकरेंचा ‘कार्याध्यक्ष’ म्हणून उदय आणि शिवसेनेचा नवा अध्याय-
शिवसेनेच्या इतिहासात काही क्षण हे केवळ राजकीय नसून ते एका नव्या युगाची नांदी ठरतात. सन २००३ मध्ये महाबळेश्वर येथे पार पडलेले शिवसेनेचे अधिवेशन अशाच एका ऐतिहासिक वळणाचे साक्षीदार होते. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाने शिवसेनेच्या भविष्यातील नेतृत्वाचा मार्ग निश्चित केला आणि पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची सूत्रे सोपवण्याचा निर्णय घेतला. आज, दोन दशकांनंतर, पुन्हा एकदा तश्याच पद्धतीच्या चर्चा रंगल्या होत्या.

२००३ पूर्वी उद्धव ठाकरे हे पडद्यामागून पक्षाची ध्येयधोरणे आणि निवडणुकीचे व्यवस्थापन पाहत होते. मात्र, महाबळेश्वर येथील अधिवेशनात शिवसेनेच्या कार्यकारिणीने एकमताने उद्धव ठाकरे यांची ‘कार्याध्यक्ष’ पदी निवड करण्याचा ठराव संमत केला. शिवसेनाप्रमुखांनी स्वतः या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. बाळासाहेबांच्या करिष्माई नेतृत्वाला आधुनिक आणि अभ्यासू जोड देण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला होता. या निवडीमुळे शिवसेनेच्या पन्नास वर्षांच्या प्रवासात प्रथमच ‘कार्याध्यक्ष’ हे नवे पद निर्माण झाले होते.

निवडीमागची पार्श्वभूमी आणि राजकीय महत्त्व-
त्याकाळी शिवसेनेसमोर अनेक राजकीय आव्हाने उभी होती. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक शिस्तबद्ध करणे आणि बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाची सांगड घालून जनसंपर्क वाढवणे आवश्यक होते. महाबळेश्वरच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील सत्तेचे केंद्र अधिक स्पष्ट झाले आणि भविष्यातील वारसदार कोण, यावर अधिकृतपणे मोहोर उमटवली गेली.

ज्याप्रमाणे २००३ मध्ये उद्धव ठाकरेंकडे जबाबदारी आली, तेव्हा त्यांच्यासमोर पक्षाचा विस्तार करण्याचे मोठे आव्हान होते.२००३ मधील उद्धव ठाकरेंची नियुक्ती ही शिवसेनेसाठी जशी ‘टर्निंग पॉईंट’ ठरली होती, ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीकडे अधिकृतपणे सूत्रे सोपावण्याच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या