Heat Wave Updates : संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण उष्णतेच्या विळख्यात सापडला असून, राज्याच्या तापमानाचा पारा सातत्याने चढत आहे. विदर्भातील अकोला शहरात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, येत्या १७ एप्रिल रोजी एप्रिल महिन्यातील सर्वात उष्ण दिवसाचा अनुभव येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या निम्म्या भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुढील तीन दिवसांचा जिल्हावार हवामान अंदाज-
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस तापमानामध्ये १ ते २ अंशांनी वाढ होणार आहे. पुणे शहरातही तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असून, जिल्हावार परिस्थिती खालीलप्रमाणे असेल:
१६ एप्रिल २०२६: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासह सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा जाणवेल.
१७ एप्रिल २०२६ (सर्वात उष्ण दिवस): जळगाव, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूरसह जवळपास संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र असेल. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगलीमध्येही उष्णता वाढेल.
१८ व १९ एप्रिल २०२६: या दोन दिवशी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे उकाड्यापासून अंशत: सुटका होईल.
उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी (काय करावे?)
वाढत्या तापमानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे:
पाण्याचे सेवन: तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), घरगुती लस्सी, ताक, लिंबू पाणी आणि कैरीचे पन्हे यांचा आहारात समावेश करावा.
आहार: टरबूज, खरबूज, काकडी यांसारखी पाणीदार फळे आणि ताज्या भाज्या खाण्यावर भर द्यावा.
पोशाख: हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घराबाहेर पडताना छत्री, टोपी आणि गॉगलचा वापर आवर्जून करावा.
घराचे व्यवस्थापन: दिवसा घराच्या खिडक्यांना पडदे लावून घर थंड ठेवावे आणि रात्री गारव्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
उष्णतेच्या काळात काय टाळावे? (काय करू नये?)
पेये: चहा, कॉफी, मद्य आणि जास्त साखर असलेली कार्बनिटेड शीतपेये टाळावीत, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ३ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तसेच छतावर किंवा इमारतीच्या वरच्या मजल्यावर थांबणे टाळावे.
अन्न: उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत बंद ठिकाणी स्वयंपाक करणे टाळावे.
(टीप : वरील बातमी फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.. या बातमीची पुष्टी आम्ही करत नाही)









