Mira-Bhayandar Crime : मीरा-भाईंदर, मधील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात इसमाचा जळालेल्या आणि सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. खारफुटीच्या (मॅन्ग्रोव्हज) झुडपांमध्ये सापडलेल्या या लावारिस मृतदेहाच्या गुढ प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. नवघर पोलिसांनी केवळ मृतदेहाची ओळखच पटवली नाही, तर हा घातपाताचा प्रकार असल्याचे उघड करत या हत्या प्रकरणात सामील असलेल्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सुरुवातीला या प्रकरणी केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, परंतु तपासाअंती त्याचे रूपांतर हत्येच्या गुन्ह्यात करण्यात आले आहे.
ही धक्कादायक घटना ५ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भाईंदर पूर्व येथील सचिन तेंडुलकर मैदानाच्या समोरील खारफुटीच्या जंगलात एक मृतदेह पडल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे पथक न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक) टीमसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना झुडपांमध्ये अत्यंत भीषण पद्धतीने जळालेला आणि कुजलेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाची गंभीर अवस्था पाहता, त्या व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
घटनास्थळी मृतदेहाजवळ त्याची ओळख पटवणारे कोणतेही ओळखपत्र, कागदपत्र किंवा वस्तू पोलिसांना सापडल्या नाहीत. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टन) शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. सुरुवातीला या प्रकरणी कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्यामुळे, नवघर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची (एडिआर) नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्रे फिरवून या अंधाऱ्या गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपींना गजाआड केले.
खारफुटीच्या जंगलात सापडलेल्या त्या छिन्नविच्छिन्न मृतदेहाचे गूढ उकलण्यासाठी नवघर पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली. या तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, १ जून २०२६ रोजी नवघर पोलीस ठाण्यात एका २५ वर्षीय तरुणाची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. गौरव विजयप्रकाश बडसर, वय २५ वर्ष असे या बेपत्ता तरुणाचे नाव होते. पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि नातेवाईकांच्या मदतीने पडताळणी केली असता, तो मृतदेह विजयप्रकाश बडसर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. ते गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होते. मृतदेहाची अचूक ओळख पटताच पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल केला आणि पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
हा अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव, पोलीस निरीक्षक दत्तात्रेय धुमे (गुन्हे शाखा) आणि पोलीस निरीक्षक तृप्ति देशमुख (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने (क्राइम डिटेक्शन ब्रांच) विशेष मोहीम हाती घेतली. पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण (सायबर डेटा) आणि विविध रस्त्यांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. या तपासात मिळालेल्या संशयास्पद पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली.
पोलिसी खाक्या दाखवताच या गुन्ह्याची पाळेमुळे समोर आली. या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांनी ३ सख्या भावना अटक केली आहे. या तिघांनी मिळून हा थरारक कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला. मृत विजयप्रकाश बडसर यांच्यासोबत आरोपींचे जुने वैर आणि पैशांवरून किंवा इतर कारणांवरून सातत्याने वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पुन्हा एकदा मोठा वाद झाला होता, ज्याचा सूड उगवण्यासाठी या तिन्ही भावांनी विजयप्रकाश यांना धडा शिकवण्याची योजना आखली. घटनेच्या रात्री आरोपींनी पूर्वनियोजित कटानुसार विजयप्रकाश यांना गाठले. त्यानंतर सर्वांनी मिळून एकत्र दारू प्राशन केली. विजयप्रकाश हे पूर्णपणे नशेत असल्याचे पाहून, आरोपींनी त्यांना निर्जन खारफुटीच्या झाडीत नेले. तिथे त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, मृतदेह पूर्णपणे न जळाल्यामुळे ते घाबरले आणि मृतदेह तसाच टाकून तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या संपूर्ण थरारक आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. संशयित आरोपींच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण (सायबर डेटा) आणि परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची अत्यंत बारकाईने करण्यात आलेली तपासणी, या महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींची अचूक ओळख पटवली. त्यानंतर अत्यंत गोपनीयतेने आणि वेगाने हालचाली करत पोलिसांनी या नराधमांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.
हा संवेदनशील आणि आव्हानात्मक तपास यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने (क्राइम डिटेक्शन ब्रांच) रात्रंदिवस मेहनत घेतली. या धडक कारवाईत आणि तपासाच्या प्रक्रियेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, नितीन बेंद्रे, संपत अहेर आणि सचिन उबाले यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सोबतीला पोलीस दलातील उत्तम, संतोष पाटील, भूषण पाटील, सुरेश चव्हाण, सुनील लाड, नवनाथ घुगे, सूरजसिंह घुनावत, मुकेश निकम, ओमकार यादव, अमित तडवी, संकेत मगर, वेदांत वाघ, नवनाथ पवार आणि उमेश असवार या सर्व तडफदार अंमलदारांसह संपूर्ण पोलीस पथकाने या कामगिरीत आपले योगदान दिले.










