Home / महाराष्ट्र / NCP News : “निधी न दिल्यास पदावरून हकालपट्टी? पक्षनिधीच्या मुद्द्यावरून पार्थ पवार आक्रमक; नेत्यांचे धाबे दणाणले!

NCP News : “निधी न दिल्यास पदावरून हकालपट्टी? पक्षनिधीच्या मुद्द्यावरून पार्थ पवार आक्रमक; नेत्यांचे धाबे दणाणले!

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अंतर्गत रचनेत आणि आर्थिक नियोजनात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल झाले असून, पक्षाच्या निधी संकलनाबाबत...

By: Team Navakal
NCP News
Social + WhatsApp CTA

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अंतर्गत रचनेत आणि आर्थिक नियोजनात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल झाले असून, पक्षाच्या निधी संकलनाबाबत (पार्टी फंड) एक मोठी घडामोड समोर आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय महासचिव पार्थ पवार यांनी पक्षाचे मंत्री आणि आमदारांना पक्षनिधी जमा करण्याचे ठराविक उद्दिष्ट (आर्थिक लक्ष्य) दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांना निश्चित रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर आमदारांना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी मिळालेल्या शासकीय निधीपैकी ठराविक हिस्सा पक्षनिधीसाठी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या आदेशाचे पालन न केल्यास प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देखील घेतला जाऊ शकतो, असा थेट व कडक इशारा लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याचे समजते. अद्याप या विषयावर पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नसली, तरी या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आर्थिक व प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत मोठे फेरबदल-
केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन संरचनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक व्यवहारांची आणि पक्षीय प्रशासनाची सर्व सूत्रे आता पूर्णपणे पवार कुटुंबाच्या हाती केंद्रित झाली आहेत. या नवीन रचनेनुसार पक्षाचे अधिकार पदभार खालीलप्रमाणे विभागण्यात आले आहेत:

राष्ट्रीय अध्यक्ष (सुनेत्रा पवार): पक्षाच्या सर्वोच्च नेत्या म्हणून संपूर्ण धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

राष्ट्रीय महासचिव (पार्टी समन्वयक – पार्थ पवार): पार्थ पवार यांच्याकडे पक्षांतर्गत समन्वय, संघटन वाढवणे आणि थेट लोकप्रतिनिधींकडून पक्षनिधीचे नियोजन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रीय सचिव व खजिनदार (जय पवार): जय पवार यांना राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असून, प्रत्यक्ष खजिनदार म्हणून पक्षाच्या तिजोरीची किल्लीही त्यांच्याकडेच सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतीला शिवाजीराव गर्जे हे खजिनदार म्हणून लेखापरीक्षण (ऑडिट) आणि हिशोबाचे तांत्रिक काम पाहणार आहेत.

बँकेचे सर्वाधिकार आणि ज्येष्ठ नेत्यांना डच्चू-
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत बँक खात्यांचे संचालन, आर्थिक देवाणघेवाण आणि स्वाक्षरीचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार वाय. पी. त्रिवेदी यांच्याकडे होते. मात्र, नवीन नियमावलीनुसार पक्षाच्या बँक खात्यांमधून पैसे जमा करण्याचे किंवा काढण्याचे सर्वाधिकार आता केवळ सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांकडेच राखीव ठेवण्यात आले आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या