Mumbai Crime : मानवी नातेसंबंधांना काळिमा फासणारी आणि क्रूरतेचा कळस गाठणारी एक रक्ताळलेली घटना मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये उघडकीस आली आहे. आपल्या पत्नीचे परपुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने पछाडलेल्या पतीने, पत्नीच्या डोळ्यादेखतच तिच्या कथित प्रियकराची हत्या केली. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा आरे पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून अवघ्या तीन तासांत मुसक्या आवळल्या आहेत.
संशयाचे जाळे आणि वादाची पार्श्वभूमी-
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराज ओमप्रकाश शर्मा (वय ४८) आणि मृत विकास अशोक भुसारे हे दोघेही आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ५ या भागात वास्तव्यास होते. भीमराजला गेल्या काही काळापासून आपल्या पत्नीचे विकाससोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने खटके उडत होते आणि घरात अशांततेचे वातावरण होते. काही दिवसांपूर्वी विकासने आपल्या पत्नीची छेड काढल्याची तक्रारही भीमराजने केली होती, मात्र विकासचा वावर आपल्या घरात आणि पत्नीच्या संपर्कात कायम असल्याचे पाहून भीमराजच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली होती.
मद्यपान आणि रक्तरंजित थरार-
या प्रकरणाचा कायमचा निकाल लावण्याच्या हेतूने आरोपी भीमराजने एक घातक योजना आखली. त्याने विकासला आपल्या घरी चर्चेसाठी बोलावले. रात्रीच्या वेळी भीमराज, त्याची पत्नी आणि विकास या तिघांनीही एकत्र बसून मद्यपान केले. मद्याची नशा चढताच भीमराजच्या मनातील दबलेला राग उफाळून आला. “तू माझ्या घरात वारंवार का येतोस? यापुढे पुन्हा येथे दिसू नकोस,” असे म्हणत त्याने विकासशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात भीमराजने घरातील तीक्ष्ण चाकू काढून पत्नीसमोरच विकासवर हल्ला चढवला. त्याने विकासचा गळा चिरला, ज्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांचा जंगल थरार आणि अटक-
हत्तेच्या भीषण कृत्यानंतर आरोपी भीमराजने आरे कॉलनीतील घनदाट झाडीझुडपांचा आणि जंगलाचा फायदा घेत पळ काढला. घटनेची माहिती मिळताच आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तीन विशेष पथके तयार केली आणि आरोपीचा शोध सुरू केला. मध्यरात्रीच्या अंधारात जंगलात शोधमोहीम राबवत, तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपी भीमराज शर्माचा माग काढला आणि त्याला अटक केली.
न्यायालयीन कोठडी आणि पुढील तपास-
पोलीस कोठडीत असताना भीमराजने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरे पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.












